अक्कलकोट तालुक्यात पावसाचा हाहाकार,
प्रविणकुमार बाबर / सांगवी
अक्कलकोट दि.१८ – राज्यात परतीच्या पावसामुळे अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अक्कलकोट शहर आणि तालुक्यात पावसाचा तडाखा बसला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरले होते. कुरनुर धरणातून सांगवी बु नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. हा विसर्ग इतका मोठा होता की, सांगवी बु गावालगत असलेल्या नदीकाठच्या नागरिक व गावातील झोपडपट्टी मध्ये पाणी शिरले ,तत्काळ रातोरात तेथील नागरिकांना स्थलांतरित केल्यामुळे जीवित हानी ठळली असून, जिवाच्या भीतीने हातात सापडेल ते घेऊन सैरावैरा अंधारात धावताना पाहायला मिळत होते. घरातील सर्व वस्तूचे मात्र मोठ्या प्रमाणात नासधूस झाली असून, अन्न धान्य भिजले आहे. सर्व विद्युत उपकरणे पाण्यात पोहताना दिसत होते. याच पार्श्वभूमीवर सांगवी गावाला नेहमीच अशा प्रकारच्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याने, सांगवी बु गाव कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची करण्यात येत आहे.
सांगवी बु जलाशया लगत असलेली हिंदू व मुस्लिम स्मशानभूमी पूर्णपणे वाहून गेले असून, अक्कलकोट तालुक्यांत बुधवारी झालेल्या पावसामुळे पुराचा मोठा तडाखा बसला. अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले, घरांमध्येही पाणी शिरले.त्याच मुळे तालुक्यातील प्रत्येक भागातील रस्ते वाहतूक ठप्प झाली होती.
परिस्थिती नियंत्रणात आली की, प्रशासनाला तातडीने पंचनाम्याचे आदेश देऊन नुकसानभरपाई मिळावी व गावचे पुनर्वसन व्हावे, अशी मागणी येथील नागरिकांची आहे.