अयोध्या: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (५ ऑगस्ट) अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन आणि शिलान्यास केले. आता अयोध्येत भव्य राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. मंदिरासाठी भूमिपूजन केल्यानंतर पंतप्रधानांनी तेथील उपस्थित लोकांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी भगवान राम यांचा गौरव आणि भारतासाठी त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, ‘भगवान राम प्रत्येकाच्या आत आहेत आणि ते सर्वांचे आहेत. आज राम मंदिराचे स्वप्न साकार झाले आहे. आज संपूर्ण भारत राममय झाला आहे. राम मंदिर हे देशाच्या एकात्मता आणि अखंडतेचे प्रतिक बनेल.’
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे:
राम मंदिराच्या चळवळीत समर्पण होते, बलिदान होते, संघर्ष होता आणि संकल्पही होता. ज्यांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षातून हे स्वप्नं पूर्ण होत आहे. ज्यांनी राम मंदिरासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं त्यासर्व लोकांना मी नमन करतो.
राम आपल्या मनात आहे. जर आपल्याला काही काम करायचे असेल तर आपण प्रेरणा म्हणून भगवान रामाकडेच पाहतो. भगवान रामची अद्भुत शक्ती पहा. इमारती उद्ध्वस्त झाल्या, अस्तित्व मिटविण्याचे बरेच प्रयत्नही झाले. पण राम आजही आपल्या संस्कृतीचा आधार आहे.
इथे येण्यापूर्वी मी हनुमानगढीचं दर्शन घेतलं. हनुमान रामाची सर्व कामे करत होते. कलियुगात रामाच्या आदर्शांचे रक्षण करण्याचीही जबाबदारीही हनुमानाची आहे. हनुमानजींच्या आशीर्वादानेच श्री राम मंदिर भूमिपूजनाचा हा कार्यक्रम सुरू झाला आहे.
श्रीराम मंदिर हे आपल्या संस्कृतीचे आधुनिक प्रतीक बनेल, आपल्या चिरंतन विश्वासाचे प्रतिक बनेल, आपल्या राष्ट्रीय भावनेचे प्रतिक बनेल आणि हे मंदिर कोट्यावधी लोकांच्या सामूहिक संकल्प शक्तीचेही प्रतिक बनेल.
या मंदिराच्या निर्मितीनंतर केवळ अयोध्याची भव्यता वाढणार नाही तर या भागातील संपूर्ण अर्थव्यवस्थादेखील बदलेल. येथे प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील, प्रत्येक क्षेत्रात संधी वाढतील. विचार करा, जगभरातील लोक येथे येतील, भगवान राम आणि माता जानकीच्या दर्शनासाठी अनेक लोकं येतील. राम मंदिर बांधण्याची ही प्रक्रिया देशाला जोडण्याचा प्रयत्न आहे.
आजचा हा दिवस कोट्यवधी राम भक्तांच्या संकल्पांच्या सत्याचा पुरावा आहे. हा दिवस सत्य, अहिंसा, श्रद्धा आणि बलिदान या गोष्टींना न्यायप्रिय भारताची एक निष्पक्ष भेट आहे.
आजचा हा दिवस कोट्यवधी राम भक्तांच्या संकल्पांच्या सत्याचा पुरावा आहे. हा दिवस सत्य, अहिंसा, श्रद्धा आणि बलिदान या गोष्टींना न्यायप्रिय भारताची एक निष्पक्ष भेट आहे.
कोरोना व्हायरसमुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम अतिशय सोशल डिस्टन्सिंग आणि मर्यादा पाळून पार पाडावा लागला. पण रामाचं कार्य आहे म्हटल्यावर ते कार्य कसं मर्यादेत राहून पार पाडलं जातं हे देशवासियांनी जगाला दाखवून दिलं.
आपण आपल्या मर्यादाचं दर्शन तेव्हाही घडवलं होतं जेव्हा सुप्रीम कोर्टाने आपला याविषयी ऐतिहासिक निर्णय दिला होता.
ज्याप्रमाणे दगडांवर श्रीराम लिहून राम सेतू बांधलं गेले त्याचप्रमाणे घरोघरी, खेड्यात गावोगावी भक्तिभावाने ज्या शिळा पुजल्या गेल्या त्याच आज उर्जेच्या स्त्रोत बनल्या आहेत.
स्वातंत्र्यलढ्यात ज्या प्रकारे दलित, ओबीसी, आदिवासी, समाजातील प्रत्येक घटकांनी गांधीजींचे समर्थन केले. त्याच मार्गाने आज देशभरातील लोकांच्या पाठिंब्याने राम मंदिर बांधण्याचे हे पुण्यकार्य सुरू झाले आहे. या मंदिरासह केवळ नवीन इतिहास तयार केला जात नाही तर इतिहासही पुनरावृत्ती करीत आहे.
Leave a Reply