सोलापूर —
कोरोना, लॉकडाऊन काळात ऑनलाईन व्यवहार वाढले असून येणार्या काळात मोबाईल बँकिंगचे प्रमाण अधिक वाढेल. ग्राहकांनी ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी. ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आपल्या बँक खात्याची माहिती, ओटीपी कोणालाहि देवू नये, असे आवाहन बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर अजयकुमार कडू यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने अजय कडू यांचा वार्तालाप आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांनी झोनल मॅनेजर कडू यांचे स्वागत केले.
बँक ऑफ इंडिया सोलापूर झोनल कार्यालयाचे कामकाज सात जिल्ह्यामध्ये चालते. गेल्या काही माहिन्यात 27 हजार शेतकर्यांना कर्जवाटप केले आहे. आठ हजार उद्योजकांना 100 करोडो रुपयांचे कर्जवाटप केले आहे, असे सांगून अजय कडू म्हणाले, माझ्यासह बँकेतील अनेकजण कोरोना बाधित होते. कोरोनावर मात करून सर्वांनी खातेदारांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न केला.
येणार्या काळात कृषी क्षेत्र आघाडीवर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरीनानंतर आता छोट्या-मोठय़ा उद्योगांना गती येऊ लागली आहे. ज्या तरुणांना उद्योग करण्याची इच्छा असेल त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जाऊन व्यवस्थापकांना भेटावे. तरुणांना निश्चितपणे प्रोत्साहन दिले जाईल.
बँकेसमोर पुढील दोन वर्षे वसुलीचे आव्हान आहे. येणारे वर्ष बँकांसाठी खूपच आव्हानात्मक आहे. आमच्यासाठी ग्राहक सेवा सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही ग्राहक सेवेला प्राधान्य देतो. व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक सरकारी योजना आहेत. त्याचा लाभ तरुणांनी घ्यायला हवा. सबसिडीचा विचार न करता उद्योग व्यवसाय सुरू करावा असेही त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महेश हणमे यांनी केले.
Leave a Reply