प्रतिनिधी अक्कलकोट) – कोरोना लॉकडाऊन मुळे गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर दिवाळीच्या मुहूर्तावर उघडण्यात आले. त्यानंतर नाताळ व शासकीय सुट्टया, दत्त जयंती उत्सव, थर्टी फस्ट, व नुतन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर दरवर्षी वटवृक्ष मंदीरातील भाविकांची गर्दी लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग बळावू नये या करीता मा.जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक २४ डिसेंबर २०२० ते दिनांक २ जानेवारी २०२१ अखेर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर बंद ठेवून सदर कालावधीत भाविकांना अक्कलकोट शहरात प्रवेश मनाईचे आदेश पारित केले होते.
या आदेशास अनुसरून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर समितीने मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासोबत मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांची जिल्हाधिकारी निवासस्थानी दिनांक २७ डिसेंबर रोजी तोंडी चर्चा झाली. सदरहू चर्चेत कोरोना संसर्ग मंदीरात होवू नये या करिता मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सींगची व्यवस्था, मंदीर परिसरात सॅनिटायझर पुरवठा, मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शन इत्यादी व्यवस्था दिवाळी पासून मंदीर उघडल्यानंतर करण्यात आल्याचे स्पष्ट करून याची अंमलबजावणी यापुढेही कायम राहणार असल्याचे सांगीतले. यामुळे नुतन वर्षाच्या मुहूर्तावर वटवृक्ष मंदीर भाविकांना स्वामी दर्शनाकरीता खुले करण्यात यावे अशी विनंती केली. या विनंती बाबत विचार विनीमय करून मा. जिल्हाधिकारी साहेबांनी दिनांक १ जानेवारी २०२० रोजी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर उघडण्याचे नविन आदेश पारित केले असल्याने नुतन वर्षाच्या मुहूर्तावर १ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजल्यापासून भाविकांना स्वामी दर्शनाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे स्पष्टीकरण मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.