आर-सेटी केंद्रामधून ‘ऑनलाईन’ वर्ग चालवा : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

  सोलापूर,दि.25: बँक ऑफ इंडियाच्या आर-सेटी (रुरल सेल्फ एम्लॉयमेंट ट्रेनिंग इंन्स्टूटयूट) केंद्रामधून ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग चालवले जावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.

          बँक ऑफ इंडियाच्या आर-सेटी केंद्राच्या वार्षिक कार्यअहवालाचे प्रकाशन आज श्री.शंभरकर यांच्या हस्ते झाले. तसेच जिल्हा स्तरीय सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.टी.यशवंते, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक  प्रशांत नाशिककर, आर-सेटी चे संचालक विश्वास वेताळ आदी उपस्थित होते.

          श्री.शंभरकर यांनी केंद्रात प्रशिक्षण देत असताना ऑनलाईन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा. अनलॉक-5 नंतर प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरवात करण्याचा विचार करावा. त्यावेळी प्राधान्याने शहरातील युवकांसाठीच प्रशिक्षण द्यावे. शक्यतो निवासी प्रशिक्षण ठेवू नये. प्रशिक्षणाच्या दरम्यान आरोग्य  विभागाच्या सूचनांचे पालन करावे.

          प्रशिक्षण बंद ठेवू नये. केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सूचनांचे पालन केले जावे. जास्तीत जास्त प्रशिक्षण वर्ग स्वयंरोजगाराला प्राधान्य देणारे असावेत, अशा सूचनाही श्री.शंभरकर यांनी दिल्या.

          प्रारंभी,श्री.कडू यांनी आर-सेटी मधून गेल्यावर्षी घेतलेल्या प्रशिक्षण वर्गाबाबत माहिती दिली. श्री.वेताळ यांनी प्रशिक्षण वर्गासाठी निवडीचे निकष प्रशिक्षणाची फलनिष्पती याबाबत माहिती दिली. यावेळी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदिप झिले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

          बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी अमोल सांगळे, जिल्हा परिषदेच्या मिनाक्षी मडिवाळी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे लामगुंडे आदी उपस्थित होते.