प्रेमदिनाचे औचित्य साधून इंटॅक ने आयोजित केलेल्या वारसा फेरीस भरभरून प्रतिसाद देउन सोलापूरकरांनी आपले इतिहास व वारसाप्रेम दाखवून दिले.
नागरिकांना आपल्या गौरवशाली स्थानिक वारशाची ओळख व्हावी म्हणून इंटॅक संस्था अनेक उपक्रम आयोजित करते. वारसा भेटीत एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देउन वास्तुंची पाहाणी करून, तज्ञ मार्गदर्शकांकडून इतिहास व सौंदर्य जाणून घेतले जाते.
सहलीची सुरूवात सोलापूर महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी शुभेच्छा देऊन केली. इंटॅकची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली तसैच त्यांचा सत्कार करण्यात आला. पर्यावरण समितीच्या तळे यांनी सर्व सहभागींना रोपे भेट दिली.
हत्तरसंग कुडल येथे मध्ययुगीन हरीहरेश्वर व संगमेश्वर मंदिरे आहेत. उत्तर चालुक्यकालीन संगमेश्वर मंदिरात मराठीतला आद्य शिलालेख पाहायला मिळतो तर पुरातत्त्व खात्याने जीर्णोध्दार केलेल्या हरीहरेश्वर मंदिरात गोपाळकृष्ण, गणेश, भैरव, नाग तसेच सुरसुंदरी, नर्तिका, यक्ष अशा अनेक उत्तम शिल्पकृती व अप्रतिम कलाकुसर पाहता येते. वारसा भेटीत या दोन्ही मंदिरांचे ऐतिहासिक महत्त्व व कलाकृतींचे वर्णन समन्वयक सीमंतिनी चाफळकर यांनी सांगितले. रसिकांनी दोन्ही मंदिरे पाहिली, भीमा सीना संगमाचे विहंगम दृश्य पाहिले. निसर्गसौंदर्य व मानवनिर्मित कलात्मक सौंदर्य आठवणीसाठी कॅमेर्यात टिपले.
त्यानंतर स्थानिक मंडळींच्या आतिथ्याचा लाभ घेऊन जवळच असलेल्या औरादमधे वाडा भेटीसाठी वारसाप्रेमी रवाना झाले.
औराद येथील कमानदार वेस, मारूती मंदिर पाहून शंकर पाटील यांच्या भव्य वाड्यात मंडळी पोचली. १९२६ साली उत्तम दगडी व लाकडी बांधकामात बांधलेला हा प्रचंड वाडा आजही सुस्थितीत आहे. दोन मोठी स्वयंपाकघरे, एका वेळी ५०० लोकांची पंगत बसेल इतक्या भव्य ओसर्या, छतातून झिरपणारा सुंदर सूर्यप्रकाश, जाड भिंतींमुळे भर उन्हाळ्यातही थंड राहणारी वास्तु पाहून शहरात लहान जागेत राहण्याची सवय असणारी शहरी मंडळी खुश झाली. पाटील कुटुंबिय व बिराजदार या मंडळींचा पाहुणचार स्वीकारून व त्यांचे आभार मानून सर्व जण परतले.
या भेटीच्या संयोजनासाठी डाॅ नरेंद्र काटीकर, श्वेता कोठावळे व पुष्पांजली काटीकर यांनी परीश्रम घेतले. शेख, कुडलचे कोरके तसेच केएलई प्रशाला यांचे सहकार्य लाभले.
या भेटीत रेगोटी, गिरे, व्हटकर, श्रीराम, केसकर, बाबा, परळीकर, बिराजदार, निमकर, गोरे, सिन्हा, घुगे, अगरवाल, मानु यांनी सहपरिवार सहभाग घेतला. तसेच अनेक विद्यार्थी, सध्या सोलापुरात राहून वर्क फ्राॅम होम करणारे अनेक युवक युवती, शिक्षक, व्यावसायिक व गृहिणी यात सहभागी झाले होते.
Leave a Reply