मनपा उपायुक्तांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्याप्रकरणी उपमहापौर राजेश काळे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी कनकदंडे यांनी दिला. सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून ५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात उपमहापौर राजेश काळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तब्बल ७ दिवस काळे फरार होते. त्यांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुना तुळजापूर नाका येथे पाठलाग करून अटक केली आणि सदर बझार पोलीस ठाण्याकडे सुपुर्द केले त्यानंतर काळे यांना न्यायालयात उभे करण्यात आले.
सरकार पक्षाच्यावतीने ॲड. पी.के. जाधव यांनी आरोपी काळे यांच्याकडे पोलीस तपास करणे आवश्यक आहे, त्यांनी ज्या फोनवरून धमकी दिली तो फोन जप्त करणे आवश्यक आहे, म्हणून त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली त्यावरून मुख्य न्यायदंडाधिकारी कनकदंडे यांनी राजेश काळे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सरकारतर्फे ॲड. जाधव यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले करीत आहेत.