प्रविणकुमार बाबर / सांगवी
अक्कलकोट दि.१५ – राज्यात परतीच्या पावसामुळे अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अक्कलकोट शहर आणि तालुक्यात पावसाचा तडाखा बसला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. कुरनुर धरणातून सांगवी बु नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. हा विसर्ग इतका मोठा होता की, सांगवी बु गावालगत असलेल्या नदीकाठच्या नागरिक व गावातील झोपडपट्टी मध्ये पाणी शिरले ,तत्काळ रातोरात तेथील नागरिकांना स्थलांतरित केल्यामुळे जीवित हानी ठळली असून, जिवाच्या भीतीने हातात सापडेल ते घेऊन सैरावैरा अंधारात धावताना पाहायला मिळत होते. घरातील सर्व वस्तूचे मात्र मोठ्या प्रमाणात नासधूस झाली असून, अन्न धान्य भिजले आहे. सर्व विद्युत उपकरणे पाण्यात पोहताना दिसत आहेत.
रात्री उस्मानाबाद जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग व कुरनुर धरणात येणारे छोटे मोठे नाले, नद्या, ओढे, अशा अनेक पाण्याचा विसर्ग कुरनुर धरणात होत होता.त्यामुळे, रात्री ८.५५ पर्यत ६ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होता, पुन्हा रात्री १० नंतर हा विसर्ग मोठ्या प्रमाणात खालच्या भागात सोडण्यात आला असून, या बेफाम सुटलेल्या पाण्याने मोटयाळ, सांगवी बु, खु, निमगाव, बोरीउमरगे, या नदीकाठच्या व खालच्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पिक पाण्याबरोबर वाहून गेले असून, ऊस, कांदे, तूर, यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, वस्तीत ठेवले हजारो रुपयांचे खातं भिजून पाणी झाले आहे. शेताचे विद्युत मोटारी पाईप, वाहून गेले आहेत. अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्क अद्याप ही गुल झाले असून, विद्युत लाईटचा खांब काही ठिकाणी तुटलेले असल्याने विजेचा अजून ही पत्ता नाही.
पाणी आले धावून , स्मशानभूमी गेली वाहून…
सांगवी बु जलाशया लगत असलेली हिंदू व मुस्लिम स्मशानभूमी पूर्णपणे वाहून गेले असून, पूर्णपणे सिमेंट आरसीसी असेली स्मशानभूमी जमीनदोस्त झाली असुन, मुस्लीम स्मशानभूमीतील सर्व जागा पाण्याने कोर मारून सर्व पुरलेले प्रेत खालच्या बाजूला पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहे.
अक्कलकोट वागदरी महामार्गावर सांगवी खु येथे धरणाचे पाणी ओरफ्लो होऊन पाणी रस्त्यावर आले होते तर शिरशी येथे हरणा नदीचे ओढा, व शेतातील पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने शिरशी पूल वाहतुकीसाठी काल बंद करण्यात आले होते. अक्कलकोट तालुक्यांत बुधवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे पुराचा मोठा तडाखा बसला. अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले, घरांमध्येही पाणी शिरले.त्याच मुळे तालुक्यातील प्रत्येक भागातील रस्ते वाहतूक ठप्प झाली होती.
परिस्थिती नियंत्रणात आली की, प्रशासनाला तातडीने पंचनाम्याचे आदेश देण्यासाठी व नुकसानभरपाईसाठी चे प्रयत्न करू. असे ही आमदार सचिन कल्यांणशेट्टी म्हणाले. व पूरग्रस्तांना जेवण व राहण्याची व्यवस्था गावातील शाळा मध्ये करून त्याना जेवण, चहा, नाष्टा,ची व्यवस्था करण्यात आली आहे
नर -मादी धबधबा ओव्हर फ्लो झाले असून, पाण्याचा प्रवाह वाढत आहे. विशेष म्हणजे, आणखीन दोन-तीन पावसाची शक्यता असल्याने तालुक्यातील सर्व नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा तहसीलदार अंजली मरोड यांच्याकडून देण्यात आला आहे.
ठळक मुद्दे… .
शेतातील ऊस, कांदे, तुरी, या पिकांचे अतोनात नुकसान
सांगवी बु येथे स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात नासधूस
गावातील नदीकाठचे जनावरे, कोंबड्या, शेतीचे साहित्य गेले वाहून