काशी जगद्गुरु म्हणजे समाजाचे दीपस्तंभ : राजशेखर शिवदारे

काशीपीठाच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वितरण

सोलापूर : सागरातील दीपस्तंभ ज्याप्रमाणे जहाजांना दिशा दाखवतो. त्याप्रमाणे धार्मिक, आध्यात्मिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातून समाजाला दिशा दाखवण्याचे श्री काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे कार्य पाहता ते समाजातील दीपस्तंभच आहेत असे प्रतिपादन दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी केले.
श्री जगद्गुरु विश्वाराध्य ज्ञानसिंहासन,  काशीपीठ, जंगमवाडी मठ,  वाराणसीचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याकडून देण्यात येणाऱ्या श्री जगद्गुरु विश्वेश्वर शिवाचार्य शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे, श्री सिद्धेश्वर देवस्थानचे पंच सुभाष मुनाळे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य रविकांत पाटील, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रेवणसिद्ध वाडकर, शिष्यवृत्ती विभाग सहाय्यक राजशेखर बुरकुले उपस्थित होते.


याप्रसंगी प्राचार्य डॉ. हलकुडे यांनी स्पर्धेच्या युगात शिक्षण खूप महत्वाचे असून जिद्द, चिकाटी व मेहनतीद्वारे आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. काशी जगद्गुरुंनी दिलेली शिष्यवृत्ती हा त्यांचा आशीर्वादरुपी प्रसादच आहे. हा प्रसाद घेऊन जीवनात यशस्वी व्हावे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
काशीपीठातर्फे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. त्यापैकी उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या देशभरातून 300 विद्यार्थ्यांना प्रतिमहिना एक हजार रुपये शिक्षण सुरू झाल्यापासून शिक्षण संपेपर्यंत दिले जाते. त्याचे संपूर्ण कामकाज सोलापुरातून चालते. त्यापैकी सोलापूर शहरातील स्थानिक 10 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12 हजार रुपयांचे धनादेश यावेळी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा केली जाते.
कार्यक्रमाच्या  प्रास्ताविकातून रेवणसिद्ध वाडकर यांनी काशीपीठाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती संबंधी माहिती दिली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन राजशेखर बुरकुले यांनी केले.
याप्रसंगी संजय साखरे, राजेश नीला, दिपक बडदाळ, अमोल कोटगोंडे, लायप्पा बिडवे, सिद्रामप्पा शेगाव, वीरभद्र यादवाड, योगेश दुधाळे, शिवानंद घोंगडे, रेवणसिद्ध कोळी तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांचे पालक आदी उपस्थित होते.