सोलापूर,
सध्या कोरोना उपाय योजनेअंतर्गत आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत असून लसीकरणाच्या ठिकाणी बसण्यासाठी जागा, सावली आणि पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकार्यांना केली आहे.
सध्या आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी, सरकारी अधिकारी व कर्मचारी, 45 ते 59 वयोगटातील व्यक्ती तसेच साठ वर्षांवरील सर्व व्यक्तींसाठी लसीकरण सुरू आहे. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्या रांगा लावू नयेत, त्यांच्यासाठी बैठकीची व सावलीची व्यवस्था करण्यात यावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच गरज पडल्यास पाणी वाटपासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करावा, लसीकरणानंतर संबंधितांना अर्धातास निरीक्षण कक्षामध्ये बसवून ठेवावे, त्यानंतर काही त्रास नसल्याची खात्री करून त्यांना सोडावे आदी सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.