जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे पोखरापूरजवळ वाचला तिघांचा जीव

 

जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सरकारी थाट बाजूला ठेवत जखमींना दिला मदतीचा हात

जिल्हाधिकारीमध्ये दिसून आली संवेदनशीलता व माणुसकीचे दर्शन

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे गुरुवारी सकाळी सोलापूर-पंढरपूर महामार्गावरून पेनूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गच्या कामाची पाहणी करण्यासाठी जात होते. पोखरापुरजवळल सारोळे पाटी येथे एका कारच्या धडकेने दुचाकीवरील ३ लोक गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तात्काळ सरकारी थाट बाजूला ठेवत जखमींना मदतीचा हात दिला. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तीन निष्पाप लोकांचा जीव वाचला. जिल्हाधिकाऱ्यांच्या यातच स्पर्धेतून त्यांच्यातील संवेदनशीलता, मदतीची भावना आणि माणुसकीचे दर्शन संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला घडले आहे.


गुरुवारी सकाळी, सोलापूर- पंढरपूर महामार्गावरुन ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जात होते. त्यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सुरक्षा रक्षक पोलीस हवलदार मोहसीन शेख,

चालक अभिजित गलांडे आदी होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास पोखरापूरजवळील सारोळे पाटी येथे एमएच  १३ बी. एन. ५१७७ या क्रमांकाच्या स्विफ्ट कारणे एकाच दुचाकीवरून निघालेल्या तिघांना जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील सुभाष कोकाटे, जनाबाई कोकाटे, केराबाई कोकाटे हे तिघेही गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिवसभरातील कामाचा व्याप आणि सरकारी थाट बाजूला सोडून स्वतः गाडीतून खाली उतरत सुरक्षारक्षक मोहसीन शेख आणि संजय कदम यांच्या मदतीने जखमी अवस्थेत पडलेल्या दोन महिला आणि एका पुरुषाला स्वतःच्या ताब्यात असलेल्या एका बोलेरो जीपमधून तात्काळ रुग्णालयात हलविले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी संबंधित डॉक्टरांना दूरध्वनीवरून संपर्क साधून जखमीवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना केल्या.

 

नुकतेच जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात वाहन सावकाश चालवावे, हेल्मेट वापरावे, वाहतुकीचे नियम पाळावे, रस्त्यातील अपघातग्रस्तना वेळीच मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या शुभारंभच्या तिसऱ्याच दिवशी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर जात असताना जिल्हाधिकार्‍यांच्या ताफ्यासमोर अनपेक्षितपणे अपघात घडला.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्वतः समोर असलेली अनेक कामे बाजूला सारत सरकारी लव्याजम्याचा थाट बाजूला सारीत स्वतः रस्त्यावर उतरत आपल्या सहकाऱ्यांसमवेत गंभीर जखमी होऊन पडलेल्या ना मदत केली. जिल्हाधिकारी यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे तिघांचा जीव वाचला. जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्परतेतून त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला घडले आहे.

—-

सायंकाळी जखमी झालेल्याची विचारपूस

ग्रामीण भागाचा दौरा संपून जिल्हाधिकारी सायंकाळी पाच वाजता कार्यालयात आले. कार्यालयात आल्यानंतर त्यांनी अपघातात जखमी झालेल्या सुभाष कोकाटे यांचा मुलगा पांडुरंग याच्याकडे दूरध्वनीवरून अपघातग्रस्तांच्या तब्येतीची विचारपूस केली. सुरक्षा रक्षक पोलीस हवालदार मोहसीन शेख यांनी अपघातग्रस्तांनाची तब्येत स्थिर असल्याचा निरोप दिला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी सुटकेचा निश्वास सोडला.