जुलैची जुनी पेन्शन योजना रद्द ; शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी जुलैची जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द केल्याचे निर्णय आज शिक्षक व पदवीधर आमदारांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती दिली.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 10 जुलै 2020 रोजी महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी नियमावली 1981 मधील सेवाशर्तीमध्ये बदल सुचवणारी अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेत सुचवल्याप्रमाणे बदल झाल्यास राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त हजारो मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा जुनी पेन्शन मिळण्याचा अधिकार संकटात येणार होता. मात्र आजच्या विशेष बैठकीत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही अधिसूचना रद्द करत असल्याचं सांगितलं आहे.

मुंबई येथे आज शिक्षणमंत्र्यांसोबत शिक्षक, पदवीधर आमदार आणि शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी बैठक झाली. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना त्या सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाने आता विनाविलंब, विनाअट कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी शिक्षक आमदार व त्यांच्या प्रतिनिधी यांनी बैठकीत केली.

विधी व न्याय खात्याने ही अधिसूचना रद्द करण्यास हरकत नसल्याचे कळवले. त्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री यांची शिक्षक, पदवीधर आमदार व विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही अधिसूचना रद्द होण्याचा निर्णय झाला. शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी लोकप्रतिनिधी व शिष्टमंडळाला जुनी अधिसूचना मागे घेण्याचे आश्वासन दिले.