MH13 NEWS Network
कोरोना महामारीमुळे एकीकडे अनेक व्यवसायांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. तसेच दुसरीकडे अनेक व्यवसायांना याचा फायदा मिळत आहे. कोरोना संकटामुळे अनेक कंपन्या अशा आहेत, ज्यांना टाळं लावावं लागलं आहे. अशातच स्पेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क (Elon Musk) यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. दरम्यान, एलन मस्क आता जगभरातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
स्पेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असून ते फेसबुकचे संस्थापक मार्क झुगरबर्ग यांना मागे टाकत जगातील श्रीमंतांच्या यादीत आता तिसऱ्या स्थानी पोहोचले आहेत.
इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाला एसएंडपी 500 कंपन्यांच्या यादीमध्ये सहभागी करण्यात आलं आहे. दरम्यान, एलन मस्क यांच्या रॉकेट कंपनीने चार अंतराळवीरांना अंतराळात पाठवलं आहे. त्यानंतर एकाच दिवसांत एलन मस्क यांच्या संपत्तीमध्ये 7.61 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त मस्क यांच्या वार्षिक संपत्तीमध्ये आतापर्यंत 82 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या माहितीनुसार, टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्याकडे 110 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. तर फेसबुकचे मार्क झुकरबर्ग 104 अब्ज डॉलर संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत.
वार्षिक संपत्तीमध्ये वाढ झाल्यासंदर्भात बोलायचे झाले तर या यादीत मस्क यांचं नाव सर्वात पहिलं येतं. मस्क यांच्या संपत्तीमध्ये 500 श्रीमंत व्यक्तींच्या तुलनेत सर्वाधिक वाढ झाली आहे. तसेच एलन मस्क यांच्यानंतर दुसरं नाव ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आहेत. ज्यांच्या संपत्तीमध्ये यावर्षी जवळपास 70 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार, जगभरातील टॉप-10 श्रीमंतांमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये ॲमेझॉनचे जेफ बेजोस आहेत. त्यांची एकूण संपत्ती 185 अब्ज डॉलर आहे. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स129 अब्ज डॉलर, टेस्ला, स्पेस एक्सचे एलन मस्क 110 अब्ज डॉलर, फेसबुकचे मार्क झुकरबर्ग 104 अब्ज डॉलर, एलवीएमएचचे बर्नार्ड अर्नाल्ट 102 अब्ज डॉलर, बर्कशायर हॅथवेचे वॉरेन बफेट 88 अब्ज, गूगल के लैरी पेज 82.7 अब्ज, गूगलचे सर्जी ब्रिन, 80 अब्ज डॉलर, मायक्रोसॉफ्टचे स्टीव बॉलमर यांची संपत्ती 77.5 अब्ज डॉलर आणि रिलायंस इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 75.5 अब्ज डॉलर आहे.