करमाळा (सोलापूर) :
जिल्हापरिसरात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेल्या ‘त्या’ नरभक्षक बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा त्यास ठार करा अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. करमाळा तालुक्यात बिबट्याने दोन दिवसांत दोन बळी घेतल्याने शासनाने या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी केली आहे.
फुंदेवाडी (रायगाव) येथे 3 डिसेंबर 2020 रोजी बिबट्याने ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेले कल्याण फुंदे यांना ठार केले तर शनिवारी (ता. 5) अंजनडोह येथील जयश्री शिंदे या लिंबुणीच्या बागेत लिंबे गोळा करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर हल्ला करत त्यांना ठार केले आहे.
या बिबट्याने दोन्ही व्यक्तींना मारताना मुंडके धडावेगळे केले आहे. हा सर्व प्रकार पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांत दोन जणांचा बळी बिबट्याने घेतल्याने संपूर्ण तालुक्यात घराबाहेर पडताना नागरिक जीव मुठीत धरून बाहेर पडत आहेत. राज्य वन परिक्षेत्र अधिकारी कपोडकर यांच्याशी आमदार संजय शिंदे यांनी फोनवरून संपर्क साधून करमाळा तालुक्यात बिबट्याची दहशत बसली असल्याने या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठर मारण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. हा बिबट्या अहमदनगर, बीड भागातून आला असल्याचा अंदाज असून, या भागात बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश वन विभागाने दिले आहेत. हे आदेश सोलापूर जिल्ह्यासाठीही द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
Leave a Reply