दक्षिण,उत्तर पाहणी दौरा ; नुकसान भरपाई मिळवून देऊ :आ.देशमुख

सोलापूर : दक्षिण आणि उत्तर तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना शासनाकडे पाठपुरावा करुन त्वरित नुकसान भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही आ. सुभाष देशमुख यांनी देत ग्रामस्थांना धीर दिला. यावेळी आ. देशमुख यांनी गावकर्‍यांची राहण्याची आणि खाण्याची त्वरित व्यवस्था करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले.

आ. देशमुख यांनी शुक्रवारी दक्षिण तालुक्यातील चंद्राळ, उत्तर तालुक्यातील तिर्‍हे, शिवणी, तेलगाव, पाकणी, नंदूरसह इतर भागात जाऊन नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार अमोल कुंभार, हत्तूरचे सरपंच धर्मा राठोड, प्रशांत सलगर, गटविकास अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी आपल्या भागात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. अनेक महिलांना शेताचे नुकसान झाल्याचे सांगताना अश्रू अनावर झाले होते. यावेळी आ. देशमुख यांनी महिलांना धीर देत शासनाकडे पाठपुरावा करून मदत देण्याचे आश्‍वासन दिले.

चंद्राळ गावातील ग्रामस्थांची व्यवस्था हत्तूर येथील जि.प. शाळेत करून त्यांची जेवण्याची, पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले तसेच झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यासही अधिकार्‍यांना सांगितले. याशिवाय आ. देशमुख यांच्या सूचनेनुसार बचाव कार्यासाठी महसूल, पोलिस विभागाची पथके आणि एनडीआरएफची टीम विविध भागात पाठवण्यात आली आहे.