दैनिक पुण्यनगरीचे संपादक मुरलीधर उर्फ बाबा शिंगोटे यांचे निधन

सोलापूर / प्रतिनिधी
दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक- संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांचे गुरुवारी (दि.६) दुपारी एक वाजता यांचे जन्मगाव असलेल्या गायमुखवाडी (उंब्रज) (ता. जुन्नर) येथे निधन झाले.
बाबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडी (उंब्रज) या गावी ७ मार्च १९३८ ला झाला होता. इयत्ता चौथी शिक्षण झालेल्या बाबांनी शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. त्याठिकाणी सुरुवातीला फळ विक्री त्यानंतर बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुुंबईतल्या फाउंटन परिसरात आंदोलन झाले होते, त्याचे बाबा साक्षीदार होते. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. १९९४ मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक सुरू केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जन्मगावी सामाजिक अंतर राखण्यासंबंधी नेमून दिलेल्या नियमांचे पालन करुन अंत्यसंस्कार होणार आहेत.

‘कंपनी ‘ वर जिवापाड प्रेम करणारे बाबा... शेवटच्या श्वासापर्यंत ‘कंपनी ‘ साठी झटणारे बाबा… ‘पुण्यनगरी’ परिवार म्हणजे बाबांची ‘कंपनी’… कंपनीचं भलं म्हणजे बाबांचं समाधान… याच समाधानासाठी बाबा भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत राब राब राबायचे. एक अत्यल्पशिक्षित माणूस नकळत्या वयात घरातून बाहेर पडतो आणि पडेल ती व मिळेल ती कामे करत करत अनुभवाच्या शाळेत शिकतो. भल्या पहाटे मुंबईतल्या घरोघरी वृतपत्र टाकता टाकता माणसं जोडत राहतो. जोडलेली माणसं स्वतः सोबत ठेवून वृतपत्र विक्रीच्या व्यवसायात बाबा ‘बाप ‘ माणूस बनतो. तोपर्यंत वृतपत्र विक्रेत्यांचे संघटनही मजबूत बनलेले असते. अशावेळी मुंबईतील एका प्रचंड खपाच्या प्रसिद्ध वृत्तपत्राने बाबांकडील एजन्सी अचानक बंद केली. बाबांच्या संघटनेतील विक्रेत्यांना त्याचा मोठा फटका बसला. त्यावेळी बाबा पेटून उठले. केवळ विक्रेत्यांच्या हितासाठी बाबांनी स्वतःचे वृत्तपत्र काढले.

त्याच वृत्तपत्र समुहाने आज महाराष्ट्र व्यापला आहे.शून्यातून जग निर्माण केलेले पाहयचे असेल तर बाबांकडे पहावे. बाबांकडून काही घ्यायचेच असेल तर अपार कष्ट करण्याची वृत्ती घ्यावी. जिद्द घ्‍यावी. कामाच्या प्रती असलेली पराकोटीची निष्ठा घ्‍यावी. त्यांचा अवर्णनीय असा उत्साह घ्यावा. त्यांचा साधेपणा घ्यावा. आपण स्वीकारलेल्या कामात स्वतःला झोकून देऊन काम करण्याची पद्धत घ्यावी. कामासाठी केलेले समर्पण घ्यावे. चिकाटी घ्यावी. कामाशी एकरूप होण्याची त्यांची कला घ्यावी. त्यांचे अफलातून वेडेपण घ्यावे. भोळेपणा तर घ्यायलाच हवा. एवढं सगळं घेत असताना त्यांची कामाप्रती असलेली तळमळ मागे ठेवून कशी चालेल? ती सुद्धा घेतलीच पाहिजे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कदर कशी केली जाते हे सुद्धा बाबांकडून शिकून घ्यावे.
संस्थेविषयी आणि संस्थेतल्या माणसांविषयी असलेला प्रेमळपणा हा तर बाबांचा स्थायीभाव होता. म्हणूनच बाबा ‘मुरलीधरशेठ’ झाले तरी ते कंपनीतल्या सर्वांसाठी हक्काचे बाबाच होते.
आज बाबा कंपनी सोडून कायमचे निघून गेले कंपनी पोरकी झाली. अशा पितृतुल्य बाबांना ही शब्द पूर्ण शब्दांजली.