धक्कादायक घटना | अल्पवयीन मुलींचा लैंगिक अत्याचार, पाच आरोपी जेरबंद

पिंपरी चिंचवडमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये दोघा नराधमांनी एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार तर दुसऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नंतर इतर तीन साथीदारांच्या मदतीने अपहरण केल्याचं समोर आलं आहे.

दोन्ही मुली आरोपीच्या मावस बहिणी आहेत. मंगळवार 15 डिसेंबरच्या रात्री साडे नऊ वाजता ही घटना घडली. अजंठानगरमध्ये मंगळवारीच्या रात्री घरासमोर या दोघी खेळत होत्या. तेंव्हा आरोपी 20 वर्षीय आशिष सरोदे आणि 21 वर्षीय करण साबळे तिथं आले. दोघे शेजारीच राहणारे असल्याने त्यांची एकमेकांशी तोंड ओळख होती. याचाच फायदा घेत या दोघांनी मावस बहिणींशी संवाद साधला. फिरायला जाऊ असं सांगूंन ते लगतच्या पत्राशेड आणि मोडकळीस आलेल्या जुन्या कंपन्यांच्या परिसरात आले. पत्राशेडमधील पाण्याच्या टाकीजवळ आशिषने 16 वर्षीय मुलीवर जबरदस्ती करत बलात्कार केला तर मोडकळीस आलेल्या इमारतीत करणने 14 वर्षीय मुलीवर जबरदस्ती करून विनयभंग केला.

आरोपी यावर थांबले नाही, तर त्यांनी मावस बहिणींना घेऊन जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आले. मग दोघांनी तिथं निवास सुतार (वय 20), तेजस वाघमारे (वय 19) आणि कार्तिक उर्फ टिंक्या चव्हाण (वय 21) या तिघांना बोलावून घेतलं. कारमध्ये ते तिथं पोहचताच दोघींना जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि तिथून काही अंतरावर असलेल्या चिंचवड स्टेशन चौकात गाडी थांबवली. तेंव्हा काहींनी छोट्या कारमध्ये सात जण कसे काय बसले म्हणून त्या गाडीकडे नजर टाकली. त्यातील काहींनी त्यांना हटकले असता, मावस बहिणींना तिथंच सोडून पाच आरोपींनी तिथून पळ काढला.
त्यानंतर चिंचवड स्टेशन चौकातून या मुली कशाबशा घरी पोहचल्या. घडला प्रकार त्यांनी कुटुंबियांच्या कानावर टाकताच, त्यांना धक्का बसला. मग त्यांनी निगडी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी पाच ही आरोपींना जेरबंद केलं आहे.