पुणे जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समिती कार्यालयात सखी कक्ष
महिला या सर्व स्तरावर आज पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. परंतु निसर्गतः महिला शारिरीकदृष्टया पुरुषांपेक्षा भिन्न आहेत. त्यांना मासिक पाळीच्या कालावधीतही काम करावे लागते. या काळात 8 ते 10 तास सलग शारिरीक अथवा मानसिक श्रमाचे काम करणे महिलांसाठी खूप अवघड असते. मासिक पाळीच्या वेळी बहुतेक स्त्रिया किरकोळ वेदना अनुभवतात; परंतु जर वेदना तीव्र असेल तर ती सामान्य क्रियाकलापांमध्ये व्यत्यय आणते. काही महिलांना पिरीयडच्या आधीच्या दिवसांत वेदना जाणवते तर काहींना पिरीयड दरम्यान डिस्मेनोरिया होतो. खालच्या ओटीपोटात वेदना, अतिसार, डोकेदुखी, मळमळ, पाय दुखणे, थकवा, अशक्तपणा, उलट्या होणे अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. ही बाब आपणा सर्वांनाच ज्ञात आहे. महिलांची ही गरज ओळखून पुणे जिल्ह्यात महिलांना मासिक पाळीच्या दिवसांतही काम करणे सोईचे व्हावे, यासाठी त्यांना मदत म्हणून पुणे जिल्हा परिषदेत व सर्व पंचायत समित्यांमध्ये सखी कक्षाची स्थापना करण्यात येत आहे.
महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांसाठी मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये एकूण 125 महिला व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या सभेत काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. महिलांना मासिक पाळीच्या काळात काम करणे शक्य व्हावे म्हणून सखी कक्ष (वुमन फ्रेंडली रूम) उभारण्यात यावा. महिला कर्मचाऱ्यांसाठी तक्रार पेटी असावी. कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी वाहतूक व्यवस्था असावी. महिला कर्मचाऱ्यांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य तपासणीचे आयोजन व विशेष
मार्गदर्शक शिबीरांचे आयोजन करावे. जिल्हा परिषद आवारात पाळणाघर तयार करणे. महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वसतीगृह असावे. महिलांसाठी विविध कार्यक्रम अथवा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, अशा बाबींची मागणी महिलांनी केली होती. या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांना तात्काळ कार्यवाही सुरु करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्यांदाच महिलांसाठी सखी कक्ष स्थापन करण्यात येत आहे.
या कक्षाची रचना खालीलप्रमाणे असणार आहे.
तक्रार पेटी- साधारणत: छोट्या दानपेटी एवढा आकार (1 फूट गुणिले 0.5 फूट) नारंगी रंग असलेली, जिल्हा परिषद लोगो ‘महिला तक्रार पेटी’ असे नाव प्रिंट केलेले
असावे. कुलुप किल्यांसह.
कक्ष- दरवाजा अथवा पडदे असलेला कक्ष रंगरंगोटीसह उपलब्ध करुन द्यावा. जिल्हा परिषद, पंचायत समिती आवारात असलेली एक खोली शौचालयासह असावी अथवा कक्षाच्या शेजारी शौचालय असावे अथवा बांधून देण्यात यावे.
सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशिन व्यवस्था (पेड)-
बेड, सोफा, टेबल, खुर्ची, फॅन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत आरसा, गरम पाण्यासाठी हिटर, सॅनिटरी नॅपकीन इंनसीनरेटर, प्रथमोपचार पेटी (औषधांसह), संगणक.
चॉकलेट (पेड)- स्थानिक बचतगट अथवा महिला दुकानदारांनी योग्य किमतीत उपलब्ध करुन द्यावे.
याप्रमाणे सर्व पंचायत समिती कार्यालयात सखी कक्षाची स्थापना करण्यात आली असून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सखी कक्षाचा शुभारंभ करण्यात येत आहे. 8 मार्च 2021 रोजी बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, शिरूर व वेल्हा या तालुक्यांच्या सखी कक्षाचे व तक्रारपेटीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. आंबेगाव पंचायत समितीच्या सखी कक्षाचे उद्घाटन दोन दिवसांनी करण्यात येणार आहे. खेड व मुळशी या तालुक्यांमध्ये लवकरच जागा उपलब्ध करून घेऊन सखी कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती पूजा पारगे, समाजकल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्या या सर्वांच्या सहकार्याने ही अभूतपूर्व व अनुकरणीय योजना अस्तित्वात आली आहे. सर्व संबंधित पंचायत समितीच्या सदस्या, सभापती, उपसभापती यांच्या प्रयत्नांनी तालुकास्तरावरही सखी कक्ष उभा राहिला आहे.
जिल्हा परिषद प्रशासनात काम करणाऱ्या व जिल्हा परिषदेला भेट देणाऱ्या महिलांचा प्रश्न समजून घेऊन त्यांना सुविधा पुरविण्यात येत आहे. या सर्व बाबींचा महिला वर्गाच्या कार्यक्षमतेवर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास आहे.
– राजेंद्र सरग, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे
Leave a Reply