पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार बार्शी येथील डॉ. बबन यशवंतराव यादव यांना जाहीर झाल्याची माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. डॉ. यादव यांनी शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. यंदा दि. 1 ऑगस्ट, 2020 रोजी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन असल्याने विद्यापीठाचा वर्धापन दिन साध्या पद्धतीने ऑनलाईन प्रणालीद्वारे साजरा झाला. त्यामुळे यावर्षी वर्धापनदिनी देण्यात येणारे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते. या पुरस्कारांची घोषणा सोमवारी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केली आहे. यात जीवनगौरव पुरस्कार बार्शीचे डॉ. यादव यांना जाहीर झाला आहे. रोख 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सोमवार, दि. 22 फेब्रुवारी 2021 रोजी विद्यापीठाचा 16 वा दीक्षांत समारंभ ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. याचे औचित्य साधून विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी प्र. कुलसचिव प्रा. डॉ. विकास घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, कनिष्ठ लिपिक मल्लिकार्जून मुडगी यांनी कामकाज पूर्ण केले.
यांना जाहीर झाले पुरस्कार
1) उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार : शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज
2) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: के. एन. भिसे, आर्टस, कॉमर्स ॲन्ड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, कुर्डूवाडी
3) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार : प्राचार्य, डॉ. बब्रुवाहन पांडूरंग रोंगे, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर
4) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार: डॉ. विष्णू पांडूरंग शिखरे, कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी
5) उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार: कैलास वसंतराव देशमुख, प्रबंधक, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा