विक्रम ढोणे यांची माहिती; अहिल्यादेवींच्या स्मारकप्रश्नी आजपासून आंदोलन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकासंदर्भात राज्य शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ सोमवार, दि. 25 जानेवारीपासून बेमुदत उपोषण होणार आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असलीतरी आमचे उपोषण होणार असल्याचे धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सांगितले.
सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींचे स्मारक हे शासकीय निधीतून झाले पाहिजे, अशी भुमिका घेवून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे नमूद करून ढोणे यांनी म्हटले आहे की, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑक्टोंबरमध्ये मुख्यमंत्र्यांच्याहस्ते स्मारकाचे भुमीपूजन करण्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणेला पाच महिने उलटले तरी भुमीपूजन झालेले नाही, शिवाय शासनाने एक रूपयाचीही तरतूद केलेली नाही. सरकारचे प्रतिनिधी फक्त घोषणा करून मोकळे झाले आहेत. यासंदर्भात शासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर दि. 25 जानेवारी 2020 पासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत. अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी तरतुदीचा लेखी आदेश काढावा आणि भुमीपूजनाची नेमकी तारीख जाहीर करावी, अशी आमची मागणी आहे. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही हे आंदोलन आम्ही करणार आहोत. आमचे आंदोलन हे शांततेच्या मार्गाने आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून केले जाणार आहे, तसे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लेखी दिले आहे. त्यामुळे पोलिसांनीही सहकार्य करावे, उगीच प्रकरण संवेदनशील करू नये, असे ढोणे यांनी म्हटले आहे.
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी स्मारकप्रश्नी उदासिनता सोडावी आणि पुढाकार प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन आम्ही केले आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. तोपर्यंतच पोलिसांनी आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. स्मारकाचा विषय हा सामजिक असताना पोलिस प्रशासनाने दडपशाहीची भुमिका घ्यायची गरज नव्हती. पाकलकमंत्री व प्रशासनाने आमची भुमिका ऐकून घेवून मार्ग काढावा, अशी संवादी भुमिका आमची आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळावा, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.