Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

प्राचीन मंदिरे हा राज्याचा सांस्कृतिक वारसा असून हे वैभव जपण्याच्या दृष्टीने या मंदिरांच्या संवर्धनासाठी  राज्य शासनाकडून स्वतंत्र निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.

पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. श्री.ठाकरे म्हणाले, मंदिरांचे पावित्र्य, स्वच्छता यासोबतच येणाऱ्या भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल. टप्प्या-टप्प्याने प्राचीन मंदिरांचा विकास करण्यात येणार असून त्यात कोणत्या मंदिरांचा समावेश करायचा याबाबत सभागृहाच्या सदस्यांनी सूचना कराव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून सर्वोच्च्‍ा न्यायालयातील लढा सर्वांच्या सहकार्यातून निश्चितच जिंकू असा विश्वास व्यक्त करत श्री. ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य शासनाच्या भूमिकेत अजिबात बदल झालेला नसून पूर्वीचे वकीलही बदलण्यात आलेले नाहीत. मराठा संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा सुरु आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देताना  ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही हा आपला शब्द असल्याचेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही असे सांगून श्री.ठाकरे म्हणाले की, कोरोनाचे संकट संपूर्ण जगालाच नवीन असताना राज्य शासनाने अतिशय उत्कृष्टरित्या यासंदर्भातील काम हाताळले. त्याची दखल जगाने घेतली. कोरोना प्रतिबंधासाठी राबवलेल्या ‘धारावी मॉडेल’चे कौतुक जागतिक आरोग्य संघटनेने केले.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अशी मोहीम राबविणारे आपले राज्य संपूर्ण देशात पहिले किंवा एकमेव राज्य आहे. यामध्ये आरोग्य सेविका, अंगणवाडीसेविका, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, पोलीस शासकीय यंत्रणा या सर्वांनी अतिशय चांगले काम केले. या मोहिमेमुळे महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा तयार झाला. सहव्याधी असलेल्या नागरिकांची माहिती कळल्यामुळे त्यांच्याकडे आपण व्यवस्थित लक्ष देऊ शकलो. लोकांची ऑक्सीजन पातळी समजल्यामुळे काहीजणांचे प्राण वाचवू शकलो, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, राज्याने देशात पहिल्यांदा कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला. विक्रमी वेळेत कोविड रुग्णालयांची उभारणी केली. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी लपवली नाही. संपूर्ण महाराष्ट्र एक कुटुंब म्हणून कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरला. त्यातून या आजारावर आपण नियंत्रण मिळवू शकलो. तथापि, अद्याप लस आली नसल्याने पाश्चिमात्य देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती आपल्याकडे येऊ नये यासाठी यापुढील काळातही अजून दक्षता घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पर्यावरणाचे संरक्षण करतच राज्य शासनाचे विकासाला प्राधान्य राहील असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, शहरांच्या विकासासाठी जंगले नाहीशी होत असताना शहरातील जंगल जपण्याचा प्रयत्न आरेच्या निर्णयातून झाला. जिथे वाईल्ड लाईफ अर्थात वन्यजीव आहेत त्या जंगलांना संरक्षित करत आहोत, तेथील जंगलाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न असल्याचेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *