बस्स 1 मिनिट | ‘ड्रायव्हर’ बनला अनेकांसाठी ‘मोटिवेशनल स्पीकर’

 

तसं तर प्रत्येकाला बोलायला आवडते. परंतु आपण कधी हा विचार केला आहे का?केवळ आपल्या बोलण्याच्या मार्गाने पैसे आणि प्रसिद्धी मिळू शकते. शिवाय आपल्या विचाराने इतरांचे आयुष्य बदलून जाते. होय… असे काही ‘मोटिवेशन स्पीकर’ आहेत जे आपल्या शब्दाची जादू इतरांवर पसरवतात. ते विचार ऐकून लोकांना निराशेच्या अंधारातून बाहेर येऊन आशेच्या प्रकाशात नवीन कार्य करण्यास मदत होते. असाच एक ‘मोटिवेशन स्पीकर’ आपल्या शब्दांद्वारे लोकांना प्रभावित करत आहे. महेश मोटे असं या तरुणांच नाव !

महेश मोटे हा २५ वर्षीय तरुण मुळचा पंढरपूर तालुक्यातील बाभुळगावचा रहिवासी. डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअर शिक्षण घेतलेल्या या युवकाला बॉलिवूडचं आकर्षण होतं. त्यान मुंबई गाठली. पण त्याला यश नाही अाले. पुढे तो कामानिमित्त परदेशात गेला. अनेक आशियाई देशाचा प्रवास करत पुण्यात आला. पुण्यात आल्यावर एका कंपनीत गाडीचा ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. धष्टपुष्ट शरीर असलेल्या महेशला व्यायामाची प्रचंड अावड. सध्या तो पुण्यात ‘हीट 80’ या अमेरिकन कंपनीत ‘न्यूट्रीशियन हेल्थ कोच’ म्हणून काम करतोय.

महेश सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रेरणदायी विचार एक मिनिटाच्या व्हिडिओद्वारे मांडत असतो. तो खरोखर कोणतेही भाषण देत‍ नाही, त्याऐवजी प्रथम तो लोकांचे लक्ष वेधून घेतो. तो फक्त गंभीर गोष्टी बोलत नाही. त्याऐवजी, काही गंभीर गोष्टी अशा प्रकारे सादर करतो की जे ऐकत असेल त्याला स्वत: ला त्यांच्याशी जोडलेले वाटेल. यासाठी, तो काही उदाहरणे आणि कधीकधी काही हलके विनोद सांगतो. समाज, ठिकाण आणि देशातील लोकांची संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवरील आधारित त्याचे व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेताहेत.

अफाट माहिती

महेशकडे अनेक विषयांवर बोलण्यासाठी भरपूर माहिती आहे.  यासाठी तो खास तयारी करतो. सॉक्रेटिस, जॉर्ज हेगल, प्लुटो यांसारख्या जगभरातील फिलोसॉफरची पुस्तके आणि त्यांचे चरित्र वाचत असतो. प्रत्येकवेळी नवीनपणा, उत्साह, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, विश्वासार्हता, बोलण्यातला आत्मविश्वास यासारखे त्याचे गुण प्रभावी करतात. लोकांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण करण्याचे काम तो करत अाहेत. त्याचे विचार ऐकून लोक त्यांच्या यशाकडे वाटचाल करू शकतील यात शंका नाही.

अशी झाली सुरुवात

लॉकडाऊन दरम्यान, एकदिवस तो सहज फेसबुकवर एका विषयावर लाईव्ह बोलत होता. त्याचे बोलणे त्याच्या मित्रांना अावडले. त्यानंतर त्याने ठरविले की, अापण यांचे छोटे छोटे टिक टॉक व्हिडिओ बनवायचे. त्याचे हे व्हिडिओ हिट ठरले. झटपट लाखभर फॉलोअरही झाले. व्हिव्हर्सचा टप्पा मिलियनपर्यंत गाठला. मनोरंजन म्हणून वापरल्या जाणाऱ्या टिक टॉक मुळे त्याचे आयुष्य बदलून गेले होते. अवघ्या एक मिनिटांचे टिक टॉक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असे. मात्र या अॅपवर बंदी अाल्याने तो अाता इतर सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करत लोकांपुढे येत असतो.


मानसिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे

मोटिवेशनल व्हिडिओज बनवण्याचे कारण हेच की आपल्या दैनंदिन जीवनात बरेच लोकं मानसिकरीत्या खचली जातात. मग अशा लोकांना त्यातून बाहेर येण्यासाठी गरज असते ती सकारात्मक विचाराची. मी आयुष्यात स्वतः खूप वेगळ्या वेगळ्या अडचणीतून गेलेलो आहे, त्यामुळे मला आता चांगलेच समजले आहे की मेंटली स्ट्रॉंग राहणं हे किती गरजेचे आहे.
महेश मोटे