मंदिर उघडण्याच्या ‘वंचित’च्या आंदोलनाला ब्राह्मण समाज समन्वय समितीचा पाठिंबा

राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने 31ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला ब्राह्मण समाज समन्वय समितीने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. समितीचे प्रा. काकासाहेब उर्ङ्ग मनोज कुलकर्णी यांना पाठिंब्याचे पत्र वंचितचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांना दिले आहे. ब्राह्मण समाजाने वंचितला दिलेला पाठिंबा हा शहरात दिवसभर चर्चाचा विषय राहिला.
यावेळी कुलकर्णी म्हणाले की, राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी ऍड. आंबडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी ते पंढरपुरात भव्य आंदोलन करणार आहेत. राज्यातील सर्व मंदिरावर अवलंबून असणारे रोजगार बंद आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था ढासळली आहे. राज्यातील 70 टक्क्यांपेक्षा जास्त मंदिरात ब्राह्मण समाजाचे पुजारी नाहीत. पंढरीत ज्या मंदिरसमोर आंदोलन होत आहेत तेथेही सर्व जाती-धर्माचे पुजारी आहेत. सर्वधर्म समभाव ही सगळ्यांची असली पाहिजे, ही भूमिका ठेवून आम्ही वंचितच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मंदिरे उघडण्याचे आंदोलन छेडत वंचित आघाडीने दाखवून दिले की ते केवळ वंचित समाजाचेच नाही तर हिंदूंच्या चांगल्या प्रश्‍नासाठीही रस्त्यावर उतरतात. त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे.
यावेळी वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे म्हणाले की,वंचितच्या मंदिर उघडण्याच्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आज ब्राह्मण समाज समन्वय समितीनेही पाठिंबा दिला आहे. ब्राह्मण समाजही आज वंचित असल्यासारखा आहे. मात्र वंचितांचे नेते ऍड. आंबेडकर आहेत. ब्राह्मण समाज वंचित राहू नये, त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी आम्ही कोणतीही लढाई लढण्यास तयार आहोत. यावेळी नगरसेवक गणेश पुजारी, बबन शिंदे यांच्यासह संस्थापक ब्रम्हगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रम ढोनसळे, महाराष्ट्र प्रभारी दिनेश कुलकर्णी, प्रदेश संपर्कप्रमुख ब्राह्मण महासंघ उमेश काशीकर, व्यंकटेश मुत्तगी, मनोज गडकर, अक्षय देगावकर , वैभव पाटील, ओंकार धामणकर आदी समाजबांधव उपस्थित होते.