महिला पोलीस आत्महत्त्या प्रकरण : नातेवाईकांचा तक्रार देण्यास नकार

सोलापूर,दि.२२ : कर्तव्यावर असताना महिला पोलिसाने आत्महत्या केली . याप्रकरणी नातेवाइकांनी तक्रार देण्यास नकार दिला. परंतु, तालुका पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाची चौकशी सुरू राहणार असल्याचे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले.

जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात बारनिशी म्हणून काम करणाऱ्या पोलीस नाईक अमृता रमेश पांगरे ( वय ३८ रा. लक्ष्मीनगर बाळे ) यांनी बुधवारी दुपारी उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथील बस स्थानकाजवळ बेशुध्द अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांना सोलापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

त्यानंतर शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांकडून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना तक्रार देण्यास सांगितले होते. नातेवाइकांनी दोन दिवसानंतर तक्रार देऊ असे तालुका पोलिसांना सांगितले.

मात्र, दोन दिवसानंतर नातेवाइकांनी आमची तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले असल्याचे पोलीस निरीक्षक जगताप यांनी सांगितले. परंतु तालुका पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. त्यात जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही जगताप यांनी सांगितले.