माढ्यात जिजाऊ-सावित्री जन्मोत्सव सोहळा संपन्न,आरोग्य सेविकांचा सन्मान

माढा : जिजाऊ मासाहेब या केवळ शहाजीराजांच्या वीरपत्नीच नव्हे तर सर्व शिवभक्तांच्या आदर्श माता देखील होत्या.आजच्या महिलांनी मुलांना संस्काराची शिदोरी देताना जिजाऊ व सावित्रीबाई फुलेचा आदर्श मानुन त्यांचे चरित्र वाचावे असे मत नगराध्यक्षा ॲड.मिनल साठे यांनी व्यक्त केले. माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील जिजाऊ सृष्टी येथे फक्त सह्याद्री परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिजाऊ सावित्री जन्मोत्सव सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणुन त्या बोलत होत्या.

प्रारंभी उपस्थित महिला मान्यवरांच्या हस्ते मासाहेब जिजाऊच्या पुर्णाकृती पुतळ्यास व सावित्रीबाईच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहुन अभिवादन करण्यात आले. डाॅ.उमा पाटील यांनी सध्याच्या महिला आणि जिजामाता व सावित्रीबाई यांचा जीवनपट भाषणातून उलगडला. यावेळी कोरोनाच्या परिस्थितीत घरोघरी जाऊन प्रत्येकांची काळजी घेणाऱ्या एस.एस.गाडे, एस.एन.ढेकणे, सविता शहा, अश्विनी रणदिवे, ललिता खरात, या आरोग्य सेविकांसह आशा कर्मचाऱ्यांचा ब्लँकेट व प्रबोधनात्मक पुस्तक देऊन गौरविण्यात आले. तसेच माढा प्रेस क्लब मधील पत्रकारांना मास्क, सँनिटायझर, पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. बंडु पवार यांनी जिजाऊ गायन केले. यावेळी नगरसेविका अनिता सातपुते, सुप्रिया बंडगर, डाॅ.उमा पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या शारदा शिंदे, धनश्री शिंदे, स्वाती जगताप, शुभांगी गवळी, साक्षी नवले यांचेसह महिला नागरिक उपस्थित होते. महेश भांगे यांनी सुत्रसंचलन तर संदीप शिंदे यांनी आभार मानले.