Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी शक्य नाही, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केली. तसंच येत्या 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. याशिवाय अकरावीच्या प्रवेशाबाबत आज निर्णय होईल, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबद वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, “जून ते सप्टेंबर हे पावसाळ्याचे महिने आहेत. म्हणून मे महिन्यात या परीक्षा घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सप्टेंबर म्हटलं की निकाल येण्यास उशीर होईल आणि विद्यार्थ्याचं नुकसान होईल. त्या दृष्टीने आम्ही मंत्रिमंडळात शाळा सुरु करण्याबाबत आणि दहावी बारावी परीक्षेबाबत प्रस्ताव ठेवलेला आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता आम्ही मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देत आहोत. तसंच त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठीही आमचा प्रयत्न आहे. आम्ही दहावी बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी केला आहे आणि त्याची माहिती एससीईआरटी या वेबसाईटवर आहे.”

23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा विचार

राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरु झाल्यास दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होते. परंतु आता आपल्या सगळ्यांना परिस्थिती माहित आहे. शक्य असल्यास 23 नोव्हेंबरपासून नववी, दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरु करावेत अशी विनंती आम्ही मंत्रिमंडळाला केली आहे. कालच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. ही मुलं मोठी आहे, त्यामुळे सोशल डिस्टन्स, मास्कचे नियम पाळले जातील. संख्या जास्त असेल तर दोन वेळेला बोलवण्यात येईल किंवा दिवसाआड बोलवता येईल. 25 टक्के अभ्यासक्रम कमी केल्याने तसं दडपण कमी आहे. दहावी आणि बारावी हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे येत्या काळात विद्यार्थी आणि पालकांचं दडपण कमी कसं करता येईल यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.”

अकरावी प्रवेशाबाबत आज निर्णय?

अकरावी प्रवेशाबाबत आज निर्णय होईल, अशी माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली. “येत्या दोन ते तीन दिवसात प्रवेश प्रक्रियेला कदाचित सुरुवात होईल. अकरावीच्या सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स या तिन्ही शाखांचं ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, असं त्या म्हणाल्या. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे प्रवेश कसे देता येतील याबाबत एजींचं मत घेऊन निर्णय घेतला जाईल,” असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *