सोलापूर : एका डोळ्याने जन्मताच दिव्यांग, घरची परिस्थिती बेताचीच, लहानपणी तळ्याच्या काठी प्रथमतः सुरुवात करून चित्रकलेचे धडे गिरविले. आणि स्वतःच्या कलेला आणि परिस्थितीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. ही कहाणी आहे बार्शी तालुक्यातील जामगाव येथील एका डोळ्याने दिव्यांग असलेल्या चित्रकार महेश मस्के याची. जामगावचा हा पट्ट्या, त्याच्या कलेने आणि कर्तृत्वाने महाराष्ट्रभर चांगलाच गाजत आहे.
एका डोळ्याने दिसत नसूनही त्या परिस्थितीचे, भांडवल न करता, परिस्थितीवर मात करून त्याने हे यश संपादन केले आहे. सरपंचापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वाना त्याच्या कलेने भुरळ पाडली आहे. कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक अशा वेगवेगळ्या नामवंत मान्यवरांच्या घरी महेशची चित्रकला पोहोचलेली आहे. महेशने एका डोळ्याचा आधार घेऊन चित्रे काढली आहे.
अनेकांच्या नजरेत भरणारी त्याची ही चित्रे आहेत, पण काही डोळसांच्या नजरेत त्यांची चित्रे म्हणावी तशी भरत नसल्याने काही अंशी तो मागे पडत आहे. या चित्रात तो आपल्या भाकरीचा शोध घेतोय. व्यक्तिचित्रे काढून मिळालेल्या पैशातून तो आपला उदरनिर्वाह करतोय. प्रत्येक कलाकाराच्या कलेचा मोबदला हा त्या कलाकाराला मिळायलाच पाहिजे, असे त्याचे मत आहे.
लॉकडाऊनमध्ये त्याने पिंपळाच्या पानावर कोरीवकाम करण्याची एक वेगळीच कला विकसित केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महेश ने बनवलेली पिंपळाच्या पानावरील कलाकृतीचे कौतुक केले. तीच चित्रकला आज सर्वांना भुरळ घालत आहे. चित्रकलेत त्याने पांडुरंग फराळ, सचिन बुरांडे, पुण्याचे शिल्पकार सुनील देशपांडे यांच्याकडून धडे गिरवले आहेत. या सर्व प्रवासामध्ये, आई-वडील, भाऊ, सर्व मित्र परिवार, गुरुवर्य अशा सर्वांचेच मोलाचे सहकार्य लाभले, असे महेशने सांगितले.
यांची रेखाटलेली चित्रे
पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार शरद पवार, राज ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजी राजे भोसले, सिने अभिनेता नाना पाटेकर आदींची पेन्सिल चित्रे त्याने रेखाटलेली आहेत. दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुळजापूर दौऱ्यावर असताना महेशने त्यांना चित्र भेट दिले. मुख्यमंत्र्यांनीही या चित्रकाराचे अभिनंदन केले.
आई हीच गुरू
आईला गुरुस्थानी मानून महेशनी चित्रकलेला सुरुवात केली.
आणि आजही त्याचा हा प्रवास सातत्याने चालूच आहे. चित्रकलेमध्ये जी छाप त्याने टाकली आहे, त्याचे सारे श्रेय तो आईला देतोय. कारण तिच्याकडूनच त्याला हे बाळकडू मिळाले. कलाप्रेमी लोकांकडून महेशला प्रोत्साहन हवे आहे. त्याची चित्रे खरेदी करून घरात लावावी, ही त्याची अपेक्षा आहे.