सोलापूर : माळशिरस तालुक्यातील नागनाथ खरात यांच्या ‘नागास्टाइल’ या आगामी चित्रपटाची झेक रिपब्लिक देशातील २४ व्या जिहलावा आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिवल मध्ये निवड झाली आहे. यापूर्वी त्यांच्या ‘दिसाड दिस’ या पहिल्याच शॉर्ट फिल्म ने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले होते.
जिहलावा आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिवलला
दरवर्षी ८० देशातील ४० हजार सिनेप्रेमींनी याला भेट देतात. युरोपातील ही एक महत्वाची डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिवल आहे. तसेच ऑस्कार पात्रता फेरीतील महत्वाची फिल्म फेस्टिवल समजली जाते. ‘नागास्टाइल’ हा फिक्शन पद्धतीने बनवलेला चित्रपट, ऑस्कर पात्रताफेरीतील डॉक्युमेंटरी फेस्टिवल मध्ये निवड होणे हा एक सन्मानच असल्याचे श्री खरात यांनी सांगितले.
नागनाथ खरात हा मूळचा सोलापूर जिल्यातील माळशिरस तालुक्यातील मोटेवाडी या गावचा रहिवासी आहे. ‘दिसाड दिस’ या पहिल्याच मोबाईलवर बनवलेल्या शॉर्टफिल्म ची निवड निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात झाली होती. ‘दिसाड दिस’ नंतर चार वर्षांनी ही शॉर्टफिल्म बनवली आहे.
नागनाथ खरातने दैनिक लोकवार्ताशी बोलताना सांगितले की, ” दिसाड दिस नंतर दोन वर्षे एक हिंदी चित्रपटासाठी लेखन केले होते. पण हवा तसा कुणाशी संपर्क होत नव्हता. त्याचबरोबर महावितरण मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत होतो. रोज दिवस ठरलेला होता. त्याचा कंटाळा आला होता. जे करायचे होते ते काहीच जमत नव्हते आणि नोकरीही सोडता येत नव्हती. पण अस्वस्था शांत बसून देत नव्हती. म्हणून रोजच्या जगण्याचीच गोष्ट सांगितली. कार्यालयातील लोक, जवळचे मित्र, आई वडील, बहिण भाऊ यांना घेऊन रोजच्याच जगण्याची गोष्ट सांगितली. दोन तासाची फिल्म ही अतिशय कमी बजेट मध्ये बनवली आहे.”यांनी बजावली भूमिका
चित्रपटाचे लेखन दिग्ददर्शन, नागनाथ खरात यांनी केले आहे.
फिल्ममध्ये नागनाथ खरात, रामकृष्ण कारंडे, गणेश पुंढ, सोमनाथ खरात, समाधान माने, दीपक शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. योगेश जाधव, नागनाथ खरात यांनी छायाचित्रण केले आहे तर कुमार भोसले, विद्यानंद कडूकर, रुचिता भुजबळ यांनी तंत्रसाह्य केले आहे.ऑनलाईन होणार जगभरात रिलीज
‘नागास्टाईल’ ८ नोव्हेंबर पासून जगभरात अॉनलाईन रिलीज होणार आहे. भारत आणि सिंगापूर वगळता जगभरातील सिनेप्रेमींना याचा आनंद घेता येणार आहे.