आज देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ झाला. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लसीकरण मोहिमेचं उद्घाटन झालं. कोरोना योद्ध्यांना लस देत ही मोहिम सुरु झाली.
पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे, येत्या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तर लसीकरणाच्या रुपात आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला उपस्थिती लावत लसीकरणाचा शुभारंभ केला.
भारतात या लसीकरणासाठी सीरमच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आजच्या लसीकरणादरम्यान काही केंद्रांवर कोव्हॅक्सिनच्या लसीला विरोध झाल्याचे दिसून आले. यापार्श्वभूमीवर कोव्हॅक्सिन लस निर्मिती कंपनी भारत बायोटेकने घोषणा केली की, या लसीचे जर काही साईड इफेक्ट्स जाणवले तर कंपनी याची नुकसान भरपाई देईल. कोव्हॅक्सिनला भारत सरकारकडून 55 लाख डोसची ऑर्डर मिळाली आहे.
कंपनीने एका पत्राद्वारे ही घोषणा करताना म्हटलं की, “कोणत्याही प्रतिकूल किंवा गंभीर प्रतिकूल घटनेदरम्यान सरकारच्यावतीनं अधिकृत केंद्र आणि रुग्णालयांमध्ये चिकित्सिक स्वरुपात मान्यता प्राप्त मानकांनुसार, उपचारांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. जर लसीमुळे साईड इफेक्ट झाला तर कंपनीकडून याची भरपाई देण्यात येईल.”
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनने कोविड-19 लसीविरोधात एंटीडोट उत्पन्न करण्याची क्षमता दाखवून दिली आहे. दरम्यान, कोव्हॅक्सिनच्या प्रभावीपणाची निश्चितता होणे अजून बाकी आहे. कारण, या लसीची तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल अजूनही सुरु आहे.
दरम्यान, लसीकरणादरम्यानच्या फॉर्ममध्ये म्हटलं आहे की, लस घेतली म्हणजे कोविड-१९ पासून बचावासाठी निश्चित करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणं बंद केलं जाईल, असं कोणी समजून नये. याचबरोबर लस घेतलेल्यांना एक फॅक्टशीट आणि एक फॉर्म देण्यात आला आहे. ज्याला लसीमुळे साईड इफेक्ट झाला आहे त्याने सात दिवसांच्या आत हा फॉर्म भरुन देणे आवश्यक आहे.
Leave a Reply