सोलापूर, दि. १९ : नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव आषिश कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी रामपूर येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. प्रत्यक्ष पडझड झालेल्या घरात जाऊन नागरिकांना दिलासा दिला. शासन सर्वतोपरी मदत करणार आहे. हवामान खात्याने 22 आणि 23 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रत्येकाने स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची, पशुंच्या जीवांची काळजी घ्यावी. शासन तुमची काळजी घेईल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करेल.
आस्थेवाईकपणे चौकशी
रमेश बिराजदार हा शेतकरी तब्बल 24 तास झाडावर आणि पाण्यात होता. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी त्यांना बाहेर काढले होते. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी श्री. बिराजदार यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. उपचार घेतले का, तुम्हाला आता काही त्रास होतोय का, अशी विचारणा त्यांनी केली. यावर शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. रडत रडतच त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
नुकसानग्रस्तांना धनादेशाचे वाटप
यावेळी नुकसानग्रस्त रमेश बिराजदार, लक्ष्मण कोणदे, शोभा बिराजदार, नागेंद्र बिराजदार, चन्नव्वा वाघमारे यांना प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश देण्यात आले.
श्री. ठाकरे यांनी बोरी नदीची पाहणी करून नुकसान झालेल्या भागाची त्वरित डागडुजी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तहसीलदार अंजली मरोड यांनी पूरग्रस्त आणि बाधित झालेल्या कुटुंबांची माहिती दिली. रामपूर गावातील 50 टक्के रहिवाश्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याठिकाणी बोरी नदीला पूर आल्याने 40 घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेकडो एकर शेतीचेही नुकसान झाले आहे. बोरी नदीवरील पुलावर पाणी आल्याने गावाचा संपर्क तुटला होता. पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांची सात जनावरे वाहून गेल्याने दगावली आहेत. तुरीच्या आणि सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहितीही श्रीमती मरोड यांनी दिली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड, जि.प. सदस्य आनंद तानवडे, सरपंच शोभा बिराजदार, उपसरपंच रोहिणी फुलारी, माजी सभापती संजीवकुमार पाटील, पंचायत समिती सदस्य ॲड. आनंदराव सोनकांबळे, अक्कलकोट बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील, गटविकास अधिकारी महादेव कोळी, पोलीस पाटील शिवानंद फुलारी, ग्रामसेवक शिवशरण धड्डे, दिलीप सिद्धे आदींसह परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
Leave a Reply