विद्यापीठातर्फे जागतिक पाणथळ दिनानिमित्त मंगळवारी आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन

सोलापूर, दि.30- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भूशास्त्र संकुलामधील पर्यावरणशास्त्र विभागामार्फत मंगळवार दि. 2 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी साडेअकरा वाजता जागतिक पाणथळ दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

या वेबिनारमध्ये ग्रीक देशातील टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ क्रेटे येथील पाणथळचे अभ्यासक डॉ. अलेक्झांडर स्टेफनकिस हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा ऑनलाइन कार्यक्रम होणार असून यात प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

जगभरात 2 फेब्रुवारीला पाणथळ दिन साजरा केला जातो. नदी, तलाव, सागरी किनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या व अनेकविध प्रकारच्या गवतांनी आणि झुडपांनी भरलेल्या पाणथळ जमिनी आपल्याला आढळतात. यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्सशेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो. सध्या आपण भूगर्भातील पाण्याचा भरपूर वापर करतो. या पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम असे प्रदेश करतात. अनेकदा आपण प्रदूषित पाणी व इतर हानिकारक द्रव्ये अशा प्रदेशात फेकतो खरे; परंतु पाणथळ जागी वाढणा-या वनस्पतीच या घटकांना गाळण्याचे काम करून पाणी शुद्ध करतात. पाणथळ जमीनीचाही चांगला वापर होतो. पर्यावरण समृद्ध होतो, याविषयी विचारमंथन होण्यासाठी विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, असे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.

या वेबिनारसाठी समन्वयक म्हणून डॉ. विनायक धुळप तर सदस्य म्हणून डॉ. डी. डी. कुलकर्णी, डॉ. एम. एम. वेदपाठक, प्रा. एस. पी. बाविस्कर हे काम पाहत आहेत. https://forms.gle/FegdRpYHG4zDxoFo9 या लिंकवरून विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना नोंदणी करता येते. https://youtu.be/6_p1JIqMP-w या लिंकवरून वेबिनारमध्ये सहभागी होता येते.