विरुष्काने दिली ‘गुड न्यूज’

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांनी आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. अनुष्का आणि विराट लवकरच आईबाबा होणार आहेत. जानेवारी 2021 मध्ये त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अनुष्का आणि विराट यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अनुष्का शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराटसोबतचा एक फोटो शेअर करुन, ‘जानेवारी 2021 पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असे कॅप्शन दिले आहे.

आज सकाळी विराटनेदेखील हाच फोटो शेअर करुन ही गोड बातमी दिली आहे. सध्या विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी), च्या टीमसोबत यूएईमध्ये आहे. त्याचा सहा दिवसांचा क्वारंटाइन काळ आज म्हणज गुरुवारी संपतोय.

विराट आणि अनुष्का शर्मा यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीच्या टस्कनी रिसॉर्टमध्ये लग्न केले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नाच्या दुस-या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांनी आपल्या मनातील गोष्ट अतिशय सुंदररित्या सांगितली होती. विरुष्काने आपल्या पोस्ट्समध्ये प्रेमाचे वर्णन वेगळ्या पद्धतीने केले होते.

प्रेम करणे म्हणजे देवाचा चेहरा पाहण्यासारखे

लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला अनुष्काने लग्नातला एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत म्हटले होते, ‘कोणा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे देवाचा चेहरा पाहण्यासारखे आहे- विक्टर ह्यूगो. प्रेमाबद्दल सांगायचे तर तो फक्त एक भाव नसून त्याहून खूप काही आहे. मी फार नशीबवान आहे की मला तू भेटलास.’

विराटनेही दोघांच्या लग्नातला फोटो शेअर करत म्हटले होते की, ‘वास्तवात फक्त प्रेमच आहे अजून काही नाही आणि देव जेव्हा तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती देतो जी दरदिवशी याच गोष्टीची जाणीव करून देतो तेव्हा तुम्ही फक्त आभार मानू शकता.’