सोलापूर : मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो वैयक्तिकरीत्या अथवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारे समाज कार्य व मदतकार्य करीत असतो. मात्र त्यामध्ये शिक्षणासाठी मदत करणे ही सर्वश्रेष्ठ भावना आहे असे प्रतिपादन श्री काशी पीठ शिष्यवृत्ती योजना प्रमुख व माजी मुख्याध्यापक रेवणसिद्ध वाडकर यांनी केले.
वीरशैव व्हिजनतर्फे समर्थ हिरेमठ या विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती देताना ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष संजय कोरे, उद्योगपती विजय नवले, वीरशैव व्हिजन उत्सव समिती अध्यक्ष सोमेश्वर याबाजी उपस्थित होते.
वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. समर्थ हिरेमठ हा एम. एसस्सी. वन विभागाच्या प्रथम वर्षात शिकत आहे. एम.एसस्सी.च्या प्रवेश परीक्षेत तो संपूर्ण देशात नववा तर महाराष्ट्रात पहिला आला आहे. त्याच्या पित्याचे निधन झाले असून त्याची आई खाजगी नोकरी करत आहे. बी.एसस्सी.चे शिक्षण त्याने दापोली जि. रत्नागिरी येथे कुरियर दुकानात रात्रपाळीत काम करून घेतले आहे. तेथून मिळणाऱ्या पगारीवर त्याने त्याचे बी.एस्सी.चे तीन वर्षाचे शिक्षण पूर्ण केले. आता त्याला डेहराडून येथील विद्यालयात प्रवेश मिळाला आहे. सध्या कोरोनामुळे त्याच्याकडे कोणतेही काम नाही. त्याच्या प्रथम वर्षाची फी 70 हजार रुपये इतकी आहे. ती भरण्यासाठी त्याच्याजवळ रक्कम नव्हती. त्याची अडचण वीरशैव व्हीजनच्या निदर्शनास आल्यानंतर व्हीजनच्या प्रत्येक सदस्यांनी स्वतःला जेवढी शक्य असेल तेवढी रक्कम देऊन 25 हजार रुपयांचा निधी जमा केला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 25 हजार रुपयांचा धनादेश समर्थच्या हाती सुपूर्द केला. त्यावेळी त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत असल्याचे दिसून आले. याचवेळी काशी पीठाच्या शिष्यवृत्ती योजनेतूनही समर्थ यास 12 हजार रुपयांची शिष्यवृत्ती लवकरच देणार असल्याचे रेवणसिद्ध वाडकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संजय कोरे म्हणाले की गरीब, गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे आज महागडे झाले आहे. अशा परिस्थितीत सातत्याने शिक्षणासाठी मदत करणाऱ्या वीरशैव व्हीजनसारख्या संस्थांची गरज आज समाजाला आहे.
यावेळी रुपाली हिरेमठ, संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, नागेश बडदाळ, आंनद दुलंगे, राजेश नीला, दीपक बडदाळ, विजयकुमार बिराजदार, अविनाश हत्तरकी, सिद्धेश्वर कोरे, संगमेश कंटी, अमित कलशेट्टी, बसवराज चाकाई, लोकेश ईरकशेट्टी, मेघराज स्वामी, बद्रीशकुमार कोडगे-स्वामी, सुनिल पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केले तर आभार प्रदर्शन विनायक दुदगी यांनी केले.
Leave a Reply