शेजाऱ्यांचे सोयाबीन करू लागण्यास गेल्या अन जीव गमावून बसल्या; माढा तालुक्यातील घटना
माढा: माढा तालुक्यातील मानेगाव परिसरातील बुद्रुकवाडी येथे दुसर्या च्या शेतात कमी लोक असल्यामुळे सोयाबीन करण्यासाठी मदतीला गेलेल्या महिलेचा मळणी यंत्रावर सोयाबीन करत असताना स्कार्प व साडीचा पदर मशीनमध्ये अडकून महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एवढी भयानक होता, की त्या महिलेचे पूर्ण डोकेच चेंदामेंदा झाला. शेजाऱ्यांचे सोयाबीन करण्यासाठी मदत करायला गेलेल्या गरीब कुटुंबातील महिला विमल विलास आतकरे (वय ४८) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, त्यावेळी विमल आतकरे या स्वतःच्या शेतामध्ये काम करत होत्या. त्या काम करत असताना शेजारच्या शेतामध्ये सोयाबीन करायला मशीन आली व माणसे नसल्याने विमल आतकरे यांना सोयाबीन करू लागण्यासाठी शेजारील दळवे यांनी आमच्या इथे थोडा वेळ, या असे सांगितले. त्यावेळी विमल त्या ठिकाणी आल्या व सोयाबीन करण्यासाठी मदत करून लागल्या. तीनच पोते सोयाबीन झाले, तोपर्यंत ही घटना घडली.
सोयाबीन करत असताना त्यांच्या डोक्याला बांधलेला स्कार्प मळणी यंत्रामध्ये अडकला. स्कार्प अडकल्यानंतर मशीनचा वेग एवढा होता, की यावेळी विमल यांचे डोके, त्या मशीन मध्ये जाऊन चेंदामेंदा झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुद्रुकवाडी येथील विलास आतकरे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, पती, सासू, सासरे असा परिवार आहे. या घटनेनंतर मानेगांव परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात शेतीची कामे चालू असल्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. परगावातून आलेल्या महिलांना तीनशे व पुरूषांना चारशे रूपये मजुरी द्यावी लागत आहे. म्हणून सर्वजण घरीच शेजारी, मित्र यांना एकमेकाकडे कामासाठी बोलवून काम उरकत आहे. व त्यातूनच घाई गडबडीत अशा घटना घडून त्या जिवावर बेतत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.