श्री सिद्धेश्वर यात्रेवर निर्बंध ; 50 जणांच्या उपस्थितीतच साजरा करण्याचे आदेश

 

ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्देश्वर यात्रा ५० जणांच्या उपस्थितीतच साजरी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत. यात्रेतील तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होम प्रदीपन सोहळा आदी सर्व धार्मिक विधी परंपरेप्रमाणे पार पाडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील लाखो भक्तांच्या उपस्थितीत दरवर्षी श्री सिध्देश्वर यात्रा भरत असते. तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होमहवन आदी धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडत असतात. मात्र यंदा कोरोना सावटाखाली यात्रा साजरी होत असल्याने भक्तांना हूरहूर लागली आहे. प्रशासनाने कोरोनाचे नियम पाळून यात्रेतील धार्मिकविधी पार पाडण्यास परवानगी दिली आहे.

यात्रेची साडेनऊशे वर्षांची परंपरा पाहता पाहता श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीने यात्रा भरविण्याबाबत सविस्तर आराखडा तयार करून तो मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाला दिला होता . त्यानंतर जिल्हा प्रशासनाने महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग व आरोग्य विभागाचा अभिप्राय घेऊन हा अहवाल राज्य शासनाला सादर केला होता. दरम्यान, शासनाने यात्रा भरविण्याबाबतचे अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले.

त्यानंतर विभागीय आयुक्तांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली तयार करून यात्रा साजरी करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निर्देश दिले. त्यानुसार महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी शनिवारी रात्री उशिरा यात्रेतील धार्मिक विधी पार पाडण्यासंदर्भातील आदेश काढले. या आदेशानुसार यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवार, १२ जानेवारी रोजी तैलाभिषेक ( यण्णीमज्जन ) या धार्मिक विधीच्या मिरवणुकीस परवानगी नाकारली आहे. मंदिरातील धार्मिक विधी व परंपरा जपण्याच्या दृष्टीने मानाचे सातही नंदीध्वज अगोदरच मंदिर परिसरात ठेवून तेथेच विधी पार पाडावेत. प्रत्येक नंदीध्वजांसमवेत पाच व्यक्ती याप्रमाणे एकूण ३५ व्यक्ती व त्यांच्यासोबत १५ पुजारी व मानकरी अशा एकूण ५० व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची यादी श्री सिध्देश्वर देवस्थान समितीने किमान दोन दिवस अगोदर पोलीस विभागाला सादर करावी.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बुधवार, १३ जानेवारी रोजी श्री सिध्देश्वर मंदिर परिसरातील संमती कट्टा येथील अक्षता सोहळ्यासाठीही मानकरी, पुजाऱ्यांसह ५० जणांना प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र अक्षता सोहळा संपल्यानंतर ६८ लिंग प्रदक्षिणाकरीता नंदीध्वज मिरवणुकीस परवानगी असणार नाही. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी गुरूवार, १४ जानेवारी रोजी सिध्देश्वर मंदिर परिसरातील तलावात नंदीध्वजांना गंगास्नान घालण्यासाठीही ५० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे . याचदिवशी सायंकाळी होमहवन विधीसाठी काढण्यात येणाऱ्या नंदीध्वज मिरवणुकीस परवानगी नसून होम मैदानावरील होमप्रदीपन सोहळा सोहळा साजरा करण्यासाठी ५० जणांना परवानगी दिली आहे.

यात्रेच्या चौथ्या दिवशी शुक्रवार, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या शोभेच्या दारुकामासाठी मात्र परवानगी नाकारली आहे. यात्रेच्या पाचव्या दिवशी शनिवार, १६ जानेवारी रोजी होणाऱ्या कप्पडकळी कार्यक्रम मिरवणुकीसही परवानगी नाकारली आहे.

●संपूर्ण यात्रा कालावधीत कोणत्याही मिरवणुकीस परवानगी नाही.
●यात्रा काळात भाविकांना दर्शनासाठी सिध्देश्वर मंदिर राहणार बंद
●करमणूक व मनोरंजनाच्या साधनांची दुकाने यंदा नसणार.
●श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीकडे यात्रा समन्वयाची जबाबदारी
●संपूर्ण यात्रा काळात कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन.
●मानाच्या सातही नंदीध्वजांचे धार्मिक विधी सिध्देश्वर मंदिरातच होणार.
●विजापूर रस्त्यावरील रेवणसिध्देश्वर मंदिरासमोरील जागेत यंदा जनावर बाजार भरणार नाही.