सोलापूर( प्रतिनिधी) – स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या 336 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने जुळे सोलापुरातील रेणुका नगर येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय अंध क्रिकेट खेळाडू अविनाश घोडके व संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या जिल्हाकार्याध्यक्ष अमिता जगदाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती संभाजीराजे यांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष श्याम कदम यांनी छत्रपती शिवरायांच्या माध्यमातुन निर्माण झालेल्या छत्रपती पदाने खऱ्या अर्थाने इथल्या रयतेला स्थैर्य दिले. आपले राज्य, आपली व्यवस्था ज्यामध्ये एका अभिषिक्त राजाच्या छत्रछायेखाली आपल्याला सर्व प्रकारच्या न्याय, सुरक्षितता आणि कल्याणाची हमी मिळु शकेल हा विश्वास इथल्या रयतेच्या मनात छत्रपती पदामुळे निर्माण झाला होता ते केवळ पद राहिले नाही, तर लोकांच्या जगण्याचा आधार बनले होते जुलमी व्यवस्था संपुन लोककल्याणकारी व्यवस्था अंमलात आल्याचे ते प्रतीक होते.
थोरल्या महाराजांच्या अकाली जाण्याने लोकांचा आधार हरवला. परत एकदा जुलमी व्यवस्थेचे सावट येऊन आपण पारतंत्र्यात जातो की काय अशी भीती रयतेच्या मनात निर्माण झाली. म्हणुन शंभुराजांनी १६ जानेवारी १६८१ या दिवशी आपला राज्याभिषेक करुन खचलेल्या रयतेला आधार दिला होता असे मत व्यक्त केले.
यावेळी संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले अरविंद शेळके, सिताराम बाबर, नागेश पवार, आशुतोष माने, सनी पाटू, महेश तेल्लुर, अजित शेटे, ओंकार कदम, मुश्ताक शेख, विनोद झळके, वैदेही जगदाळे उपस्थित होते.