गटनेता बदलायचा असेल तर चार नगरसेवकांची बैठक घेऊन त्यातून नाव निष्पन्न करावयाचे असते आणि प्रदेश कार्यालयाला पाठवायचे असते आणि प्रदेश ऑफिस ची मान्यता घेऊन तो निर्णय अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनी जाहीर करायचा असतो. मात्र तसा प्रकार सोलापूरमध्ये सोलापूर महानगरपालिकेचा गटनेता निवडताना झाला नाही अशी टीका माजी उपमहापौर व राष्ट्रवादीचे नेते दिलीप कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केली. आज मंगळवारी दि.23 फेब्रुवारी रोजी दुपारी पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्या कार्यपद्धतीवर घणाघाती टीका केली.
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार हे पक्ष संपवण्याच्या मार्गावर आहेत.असे ही ते म्हणाले. मी म्हणजेच पक्ष, मीच म्हणजे राष्ट्रवादी असे सोलापुरातील राष्ट्रवादी पक्षात मागील दोन वर्षापासून चालू आहे.
शरद पवारांनी दिल्या होत्या कानपिचक्या…
मी जेव्हा गटनेता होतो तेव्हा भारत जाधव यांनी अशाच पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेत चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला होता. तेव्हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भारत जाधव यांना स्वतः बोलावून घेऊन प्रदेशची मान्यता घेतलेली का ? असा सवाल केला होता. निरीक्षकांना कळवले होते का ? मग असे केले नसताना तुला अधिकार काय अशा कानपिचक्या दिल्या होत्या असे दिलीप कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भारत जाधव यांनी पुन्हा एकदा नगरसेवक किसन जाधव यांच्या बाबत गटनेता निवडीस संदर्भात तशी चूक केली आहे. राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांनी आम्हाला राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांनी विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला असल्याचाही सुतोवाच माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार ,प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे याबाबत तक्रार केली असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. गटनेतापदी रोटे यांची निवड झाली याबद्दल आमची नाराजी नाही. परंतु प्रोसिजर प्रमाणे कार्यवाही केली नाही. कायदा स्वतःच्या हातात ठेवला.किसन जाधव यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे वरिष्ठांकडून पुन्हा त्यांना न्याय मिळेल अशी भूमिका आम्ही घेणार आहोत.
पत्रकार परिषदेत दिलीप कोल्हे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सोलापूर शहर राष्ट्रवादीत सुंदोपसुंदीचे दर्शन घडून आले. आता यावर शहर अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष कोणती भूमिका घेणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.