करोना काळात आलेली वाढीव वीजबिलं सोमवारपर्यंत माफ करा, अन्यथा म.न.से.च्यावतीनं राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा अल्टिमेटम म.न.से. नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी दिला जात आहे.
ही महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेची घोर फसवणूक आहे.
त्यामुळे सरकारला ठिकाण्यावर आणण्यासाठी म.न.से.च्या आंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं, जर वीज मंडळाचे कर्मचारी वीज कनेक्शन कापायला आले तर म.न.से.चे कार्यकर्ते ग्राहकांसोबत असतील.
त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये, वाढीव वीजबिलं भरु नयेत, असं आवाहनंही नांदगावकर यांनी केलं आहे.
“शरद पवारांच्या शब्दाला सरकारमध्ये किंमत नाही” वाढीव वीजबिलं माफ करण्याबाबत राज ठाकरे स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटले होते.
त्यावेळी त्यांना निवेदनं देण्यास सांगण्यात आले.
त्यावर विविध कंपन्यांची निवेदनंही पवारांकडे पाठवण्यात आली.
मात्र, त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.
आम्हाल शरद पवारांवर विश्वास आहे, पण आता त्यांनाही सरकारमध्ये किंमत राहिलेली नाही असं आम्हाला वाटतं.
जनतेचा उद्रेक झाल्यास त्याची जबाबदारी सरकारची राज्य शासनाने श्रेयवादाची लढाई न करता लोकांची वीजबिलं माफ करुन टाकावीत.
सोमवारपर्यंत यावर निर्णय झाला नाही तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांवर म.न.से.कडून मोर्चे काढण्यात येतील तसेच राज्यभर म.न.से. स्टाइल उग्र आंदोलने केली जातील.
यावेळी जर उद्रेक झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल असा इशाराही यावेळी नादंगावकर यांनी दिला.