सोलापुरातील सुपर थर्मल पॉवर प्रकल्पातून पुन्हा वीजनिर्मिती सुरू !

सोलापूर : कोरोना काळात पूर्णपणे ठप्प झालेल्या सोलापुरातील सुपर थर्मल पॉवर प्रकल्पातून (एनटीपीसी) नुकतीच पुन्हा पूर्ण क्षमतेने औष्णिक वीज निर्मिती सुरू झाली आहे.  टाळेबंदी उठल्यावर गेल्या काही दिवसांत उद्योग-व्यवसायाचे चक्र पुन्हा सुरळित झाल्याने आता विजेची मागणी पुन्हा वाढू लागली आहे. यामुळे या प्रकल्पातून पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने औष्णिक वीज निर्मिती सुरू झाल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य महाव्यवस्थापक नामदेव उप्पार यांनी दिली.

महाराष्ट्रासह पाच राज्यांना पाठवली जातेय औष्णिक वीज

या प्रकल्पात कोळशापासून तयार होणाऱ्या विजेसाठी आतापर्यंत ओदिशा येथून कोळसा मागवावा लागत होता. सध्या प्रकल्पाकडे रोज ९०० ते १००० मेगावॅट विजेची मागणी आहे. महाराष्ट्रासह शेजारच्या गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, दादरा—हवेली, छत्तीसगड आदी राज्यांमध्ये ही औष्णिक वीज पाठवली जात असल्याचे उप्पार यांनी सांगितले. अलीकडे जवळच्या तेलंगणातून कोळसा आणला जात असल्याने वाहतूक खर्चात मोठी बचत होऊ लागली आहे. परिणामी वीजनिर्मिती खर्चही प्रतियुनिटमागे एक रुपयांनी घटला आहे. पूर्वी प्रति युनिट वीजनिर्मितीचा खर्च तीन रुपये ८० पैसे होता. तो आता दोन रुपये ८० पैसे झाला आहे.

दक्षिण सोलापूरात ६६० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेची दोन केंद्रे

दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथे सुमारे १८०० एकर क्षेत्रात हा सोलापूर सुपर थर्मल पॉवर प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पात प्रत्येकी ६६० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेची दोन केंद्रे आहेत. २०१२ साली मंजूर झालेला हा प्रकल्प २०१७ साली कार्यान्वित झाला. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात ६६० मेगावॅट औष्णिक वीजनिर्मिती होऊ  लागली. त्यानंतर दुसरा टप्प्यात तेवढीच वीज निर्मिती सुरू  झाली. परंतु मार्चमध्ये करोनानंतर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे उद्योगाचे चक्र थांबले आणि ‘एनटीपीसी’तील वीजनिर्मितीही थांबली. टाळेबंदीच्या या संपूर्ण काळात हा प्रकल्प बंद राहिला.