सोलापूर |उद्या जिल्हयातील 10 हजार जणांना’कोविड लस’ देणार

जिल्ह्यात आतापर्यंत 18 हजार 122 जणांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाले असून आता शुक्रवार, 12 फेब्रुवारी रोजी एकाच दिवसात दहा हजार लाभार्थ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.शितलकुमार जाधव व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत एकाच दिवशी दहा हजार लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शुक्रवारी विविध 53 ठिकाणी लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. लस न घेतलेले शासकीय व खाजगी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर ज्यामध्ये पोलीस, महसूल, पंचायत समितीकडील अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, महापालिका कर्मचारी, नगरपरिषदेकडील कर्मचारी यांना यादिवशी लस देण्यात येणार आहे. अद्यापही 36 हजार 636 जणांचे लसीकरण होणे बाकी आहे. याचाच पहिला टप्पा म्हणून एकाच दिवशी संपूर्ण जिल्हाभर एक चळवळ म्हणून लसीकरण करण्यात येणार असून अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच मोहीम आहे. यासाठीची आवश्यक कोविड लस जिल्हयास प्राप्त झालेली आहे, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.अनिरुध्द पिंपळे यांनी सांगितले. याद्वारे कोविड लसीकरणाचा पहिला डोस सर्व संबंधित कर्मचार्‍यांना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करून/पडताळणी करुन देण्यात येणार आहे. ही लस सुरक्षित असून सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

येथे लसीकरण मोहीम राबविण्यात येणार…
अक्कलकोट तालुक्यात शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, बंदिछोडे हॉस्पिटल, बार्शी तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, बकरे हॉस्पिटल, सुश्रुत हॉस्पिटल, चौधरी हॉस्पिटल, वैराग प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय पांगरी, करमाळा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय करमाळा, जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्र, माढा तालुक्यात ग्रामीण रुग्णालय माढा, ग्रामीण रुग्णालय कुर्डूवाडी, मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्र, टेंभूर्णी प्राथमिक आरोग्य केंद्र, मोहोळ तालुक्यात कामती प्राथमिक आरोग्य केंद्र, गोळवलकर हॉस्पिटल, झाडबुके हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय मोहोळ, माळशिरसमध्ये उपजिल्हा रुग्णालय अकलुज, अश्विनी हॉस्पिटल नातेपूते, ग्रामीण रुग्णालय माळशिरस, राणे हॉस्पिटल अकलुज, श्रेयस हॉस्पिटल श्रीपूर, वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा, महिला हॉस्पिटल मंगळवेढा, पंढरपूर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, लाईफलाईन हॉस्पिटल पंढरपूर, अपेक्स हॉस्पिटल पंढरपूर, ग्रामीण रुग्णालय करकंब, विठ्ठल हॉस्पिटल पंढरपूर, गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, सांगोला तालुक्यात ग्रामीण रुग्णालय सांगोला, बाबर हॉस्पिटल सांगोला, सोलापूर शहरात मजरेवाडी, सोरेगाव, रामवाडी, देगाव, जोडभावी पेठ, विडी घरकूल (हैद्राबाद रोड), मुद्रा सनसिटी, भावनारुषी, मदर टेरेसा या महापालिका दवाखान्यासह एसआरपी कॅम्प, पोलीस हेडक्वॉटर, सिध्देश्वर हॉस्पिटल, यशोधरा हॉस्पिटल, मोनार्क हॉस्पिटल, धनराज गिरजी हॉस्पिटल येथे लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.