आगामी विधानसभेत दक्षिण सोलापूरचा आमदार शिवसेनेचाच …

२२ गावच्या शिवसेना सरपंच, उपसरपंचांचा सत्कार

सोलापूर : प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूरचा आमदार शिवसेनेचाच होईल. त्याकरिता नूतन सरपंच, उपसरपंच यांनी जोरदार कार्य करावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केले.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या २२ गावांच्या सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार सोलापूर जिल्हा शिवसेना आणि दक्षिण सोलापूर शिवसेनेकडून शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, उपजिल्हाप्रमुख आणि कार्यक्रमाचे संयोजक अमर पाटील, महिला आघाडीच्या जिल्हासंघटिका अस्मिता गायकवाड, उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, शंकर चौगुले, विद्यार्थी सेनेचे विभागीय संघटक महेश धाराशिवकर, भक्ती जाधव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निरंजन बोद्धूल, दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख योगीराज पाटील, तालुका समन्वयक गंगाराम चौगुले, युवा सेना तालुका प्रमुख धर्मराज बगले, युवा सेना दक्षिण सोलापूर विधानसभा संघटक सागर तांबोळकर उपस्थित होते.

प्रारंभी हिपळे, होटगी स्टेशन, यत्नाळ, अंत्रोळी, नांदणी, वडकबाळ, घोडातांडा, कणबस, बोरूळ, माळकवठे, औराद, हत्तुर, तेलगाव, गुंजेगाव आदी २२ गावांतील शिवसेनेच्या सरपंच, उपसरपंच यांचा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या हस्ते
फेटा, पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख श्री. बरडे म्हणाले, दक्षिण सोलापूरमध्ये तब्बल २२ गावांचे सरपंच, उपसरपंच तर २२८ ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे निवडून आले आहेत. त्यामुळे दक्षिण सोलापूरमधील शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे. निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी गावच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. शिवसेनेचे भविष्य उज्वल असून सर्वांनी मिळून ताकद लावल्यास दक्षिण सोलापूरवर शिवसेनेचा भगवा निश्चित फडकेल.

शहरप्रमुख श्री. धुत्तरगावकर म्हणाले, गावाच्या विकासासाठी सर्वांना घेऊन प्रयत्न करावेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अधिकाधिक निधी दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी मिळवण्यासाठी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी संपूर्ण सहकार्य करतील.

संयोजक अमर पाटील म्हणाले, शिवसेनेच्या सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी गावच्या विकासाकरिता सक्रिय योगदान द्यावे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही विकासनिधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही अमर पाटील म्हणाले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मलकारी कोरे, अमोल पाटील, निंगराज हुळे, विश्वनाथ गंगदे, शिवराज मलशेट्टी, सौरभ सासवे, बसवराज जमखंडी यांनी परिश्रम घेतले.

तरुण सरपंचांची भेट घडविणार मुख्यमंत्र्यांशी…
दक्षिण सोलापूरमधील अंत्रोळी येथील २१ वर्षीय सरपंच कोमल करपे, नांदणी येथील २२ वर्षीय उपसरपंच बिरप्पा वरवटे आणि घोडातांडा येथील उपसरपंच मिथुन राठोड यांना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला नेणार असल्याचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा जयघोष झाला.