आज वसुबारस ; जाणून घ्या महत्त्व…

दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हणले जाते. आनंदाची दिवाळी साजरी करण्याकरीता बाल गोपाळापासून अबालवृद्ध या सणाची वाट पाहत असतात.
आज गुरुवारी वसुबारस सण सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत आहे.

वसुबारस हा दिवस साजरा करण्यामागे एक पुराणकथा सांगितली जाते. ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी त्यातून पाच कामधेनुची उत्पत्ती झाली होती या कामधेनू मध्ये नंदा नावाची एक कामधेनु होती तिला उद्देशून वसुबारस हा दिवस साजरा करण्याची परंपरा भारतात सुरू झाली.

असे म्हणतात की ,मानवाच्या जन्मोजन्मीच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि गाईच्या अंगावर म्हणजेच पवित्र मानल्या जाणाऱ्या गोमातेच्या अंगावर जेवढे केस आहेत इतकी वर्ष स्वर्गात वास्तव्य करता यावे म्हणून गोवत्स द्वादशी दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपला देश कृषिप्रधान असल्याने या दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत गाईला गोमाता समजले जाते. तिच्या उदरात 33 कोटी देवांचा वास आहे आणि म्हणून गायीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरता वसुबारस दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. आजच्या दिवशी भारतीय मोठ्या आनंदात वसुबारस साजरी करतात.