आयपीएल क्रिकेटवर सट्टा ; चौघा बुकींना जामीन मंजूर

सोलापूर,दि.२१ : आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्या चौघा बुकींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. आर. देवकते यांनी जामीन मंजूर केला. शहर गुन्हे शाखेने अवंतीनगर भाग २ मधील पर्ल हाईटस्मधील फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी चेतन रामचंद्र वन्नाल ( वय २६, रा. गांधीनगर झोपडपट्टी क्र.३ ), विघ्नेश नागनाथ गाजूल ( वय २४, रा. भद्रावती पेठ ) या दोघांना अटक करण्यात आली.

हे दोघे मोबाइलद्वारे सट्टा लावणाऱ्या लोकांकडून सट्टा घेऊन त्याचा हिशेब करीत असताना सापडले. अटकेतील दोघांची चौकशी केल्यानंतर अतुल सुरेश शिवशेट्टी ( रा. अवंतीनगर ) व प्रदीप मल्लय्या कारंजे ( रा. भवानी पेठ ) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून ३ लाख ४० हजारांची रोकड यासह सुमारे ३८ लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

या प्रकरणी चारही आरोपींनी जामीन मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. त्याची सुनावणी होऊन त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला . यात आरोपीतर्फे ॲड. अभिजित इटकर, ॲड. सागर पाटील, ॲड. सारंग काकडे यांनी काम पाहिले..