एक दिवस सैनिकांसाठी…. जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

सोलापूर, दि.18: जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियाच्या समस्या सोडविण्यासाठी 25 फेब्रुवारी 2021 रोजी ‘एक दिवस सैनिकांसाठी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले.

उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्याशी निगडीत प्रलंबित तक्रारी, समस्यांबाबत जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारून त्याच दिवशी तत्काळ निकाली काढले जाणार आहेत. तसेच महसूल, महावितरण, भूसंपादनविषयक निगडीत समस्यांबाबत प्रत्येक तहसीलदार कार्यालयात अर्जावर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.

अर्जावर कार्यवाही करण्यास वेळ लागणार असेल किंवा दुसऱ्या विभागाशी संबंधित असेल तर अर्जदाराला पोच देऊन कार्यवाहीला सुरूवात केली जाणार आहे. आजी-माजी सैनिक, विधवा पत्नी यांच्याप्रती आदर-सन्मान व्यक्त करून जिल्हा प्रशासन त्यांच्यासोबत असल्याची भावना निर्माण करणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

समस्यांबाबत लेखी अर्ज करताना आजी-माजी सैनिक ओळखपत्र आणि इतर पुराव्यासह तीन प्रतीत सादर करावा. एक दिवस सैनिकांसाठी उपक्रमाचा जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. वाघमारे यांनी केले आहे.