मुंबई : विद्यार्थी आणि शिक्षकांना आता ऑनलाइन शिक्षणातून 5 दिवसांवरून वाढ करत शालेय शिक्षण विभागाने ही सुट्टी 14 दिवसांची केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला 14 दिवसांचा ब्रेक मिळणार असल्याने विद्यार्थी व पालक वर्गाने या निर्णयाचा स्वागत केलं आहे. त्यामुळे आता ही दिवाळीची सुट्टी 7 नोव्हेंबरपासून ते 20 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. 5 नोव्हेंबर 2020 मधील परीपत्रकानुसार 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर अशी सुट्टी देण्यात आली होती यात आता बदल करून 14 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
15 जूनपासून शाळा बंद असून सुद्धा ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक ऑनलाइन शिक्षण देऊन अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. त्यामध्ये अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करता यावा, यासाठी यावर्षी सुट्या कमी देत असल्याची शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे दिवाळीच्या पाच दिवस सुट्या मिळत असल्याने शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवत नाराजी व्यक्त्त केली. एकीकडे 15 जून पासून ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याच काम शिक्षक अव्याहतपणे करत आहेत. त्याशिवाय अनेकांनी कोव्हीड ड्युटीमध्ये सुद्धा हातभार लावत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवण्याचं काम केलं. यामध्ये शिक्षकांना सुट्टी वाढवून देण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. त्यानंतर आता 5 दिवसांऐवजी आता 14 दिवस शिक्षकांना दिवाळीची सुट्टी मिळणार आहे.
त्यासोबतच दिवाळीची सुट्टी झाल्यानंतर इयत्ता नववी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभाग विचार करत असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केली. त्यामुळे एकीकडे शाळा सुरू करण्याचा जरी विचार असला तरी उद्यापासून 14 दिवस विद्यार्थ्यांना शिक्षकांना व पालकांना काही काळासाठी ऑनलाइन शिक्षणापासून विश्रांती देणार आहेत.
Leave a Reply