सोलापूर, दि.१२: जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. कोविडसाठी असलेला निधी इतर ठिकाणी खर्च न करता आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर खर्च करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यंत्रणेला आज दिल्या.
रात्री उशिरा सर्व विभागाची आढावा बैठक घेण्यात आली, बैठकीत श्री. भरणे यांनी सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. भरणे म्हणाले, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक आणि अधिष्ठाता कार्यालयाने १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत खर्चाचा आराखडा सादर करावा. आणखी लागत असलेला निधी उपलब्ध करून दिला जाईल. आरोग्य यंत्रणा, औषधे, उपकरणे, बांधकाम दर्जेदार होण्यावर भर द्या. प्रत्येक विभागाने १०० टक्के निधी खर्च करावा.
शहराचा पाणीपुरवठा सुरळित होण्यासाठी समांतर पाईप लाईनचे काम वेगाने करण्याच्या सूचनाही श्री भरणे यांनी दिल्या. महापालिकेला ९० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, त्याबाबत त्वरित प्रस्ताव देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
Leave a Reply