गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी…

बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी त्याच्या जन्मापूर्वी आईच्या प्रकृतीची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. गुटगुटीत आणि निरोगी बाळ सर्वांनाच आवडतं, मात्र असे बाळ जन्माला येण्यासाठी आईचे योग्य पोषण व्हावे, शरीरासाठी आवश्यक घटक तिला अन्नातून योग्य प्रमाणात मिळावे याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होते. हे टाळण्यासाठी गरोदर महिलांच्या आरोग्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.

 

गरोदरपणात रोज एक आयएफए म्हणजे आयर्नची गोळी रात्री जेवणानंतर घेणे आवश्यक आहे. आईने कमीत कमी 100 दिवसांपर्यंत रोज आयएफएची गोळी घ्यायला हवी. आयर्न नवजात बालकांच्या योग्य मानसिक आणि शारीरिक विकासासाठी आवश्यक आहे. गरोदरपणात गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी रक्ताची पूर्तता आईपासून होत असते.

 

एक ॲनॅमिक आई आपल्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला पुरेशा प्रमाणात रक्त पोहोचवू शकत नाही.  ज्यामुळे बाळ जन्मापासून कमी वजनाचं आणि ॲनॅमिक होत. ॲनॅमिक गर्भवती महिला एका निरोगी महिलेच्या तुलनेत बाळंतपणाच्या वेळी रक्त जाण्यामुळे खूप अशक्त होते आणि त्यात तिचा मृत्यूही होऊ शकतो.

 

आयर्नची गोळी खाण्यामुळे विष्ठा काळी येणे, बद्धकोष्ठ होणे, पोट खराब होणे, अस्वस्थ वाटणे आदी परिणाम होऊ शकतात. हे दुष्परिणाम गंभीर स्वरुपाचे नसून ते काही दिवसांत समाप्त होतात. काळी विष्ठा, बद्धकोष्ठता आणि पोट खराब झाल्यास तीन ते चार बाटल्या पाणी रोज प्यावे. आयर्नची गोळी रात्री जेवणानंतर घ्यावी. लिंबू, चिंच यासारख्या आंबट खाण्यामुळेही अस्वस्थता कमी होईल.

 

आयर्नची गोळी घेण्याच्या एक तास आणि आणि नंतर चहा-कॉफी घेऊ नका, कारण त्यामुळे आयर्न शरीरात योग्य प्रकारे विरघळू शकणार नाही. जेवणात लिंबू, संत्री किंवा आवळा यासारखी फळं खावी,  त्याची आयर्नचं पचन होण्यास मदत होईल.

 

गरोदरपणात आहारावरही योग्य लक्ष देणे आवश्यक आहे.  हिरव्या आणि पिवळ्या,नारंगी रंगाची फळं, भाज्या आणि दूध दह्यासारखे पोषक घटकांचा समावेश रोजच्या आहारात असावा. हे घटक बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी मदत करतात. मांसाहारी कुटुंबामध्ये खाल्ल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्येही असे पोषक घटक असतात. हे घटक बाळ आणि आईच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.

 

गरोदरपणात खाण्याचे प्रमाण वाढवावे. एकाच वेळी संपूर्ण जेवण जेवू शकला नाहीत तर दिवसातून बऱ्याच वेळा थोडे खावे. दिवसातून 3 वेळा खाण्यापेक्षा, 5 ते 6 वेळा खावे. दिवसातून किमान  1-2 तास आराम करावा, त्यामुळे तुमच्यातील ऊर्जेची बचत होईल आणि  बाळाचा विकास होण्यास मदत होईल. योग्य काळजी घेतल्यास मातेचे आरोग्य  चांगले राहील आणि बाळाचे पोषणही योग्यप्रकारे होऊ शकेल.