Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ अभियानात आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 96 टक्के नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी दिली.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहीम 15 सप्टेंबर 2020 पासून सुरू केली आहे. जिल्ह्यात पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे 1621 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात आरोग्य कर्मचाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचाही समावेश आहे.

आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान 50 पेक्षा अधिक घरांना भेटी देत आहेत. या घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेत असून ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन पातळी कमी होणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करीत आहेत. आवश्यकता भासल्यास या व्यक्तींची कोविड-19 ची चाचणी करून पुढील उपचार केले जात आहेत.

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकांनी आतापर्यंत 7 लाख 53 हजार 560 कुटूंबांना भेट दिली असून या कुटूंबातील 35 लाख 11 हजार 899 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे. या तपासणीत आरोग्य पथकांना 1 लाख 68 हजार 580 जुन्या विकारांचे रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, ह्दयविकार, कर्करोग, मधुमेह, अस्थमा, किडनी विकार, क्षयरोग, लठ्ठपणासह इतर आजारांचाही समावेश आहे. सारी व सर्दी, खोकला, तापाचे रुग्णही आढळून आले आहेत. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या संशयितांची तपासणी करण्यात येवून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1886 कोरोनाबाधित रुग्ण शोधण्यात आरोग्य पथकांना यश आले आहे. या रुग्णांवर विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.

मास्क वापरा, हात धुवा- जिल्हाधिकारी शंभरकर

नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्कचा वापर करावा. मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. दर दोन ते तीन तासांनी हात साबण किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना हात लावू नये. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ फिव्हर क्लिनिकमध्ये जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

ताजे अपडेट,बातम्यांसाठी 9890440480 हा नंबर आपल्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये ॲड करा किंवा आपले नाव, शहर/गावाचे नाव व्हाट्स ॲप करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *