मटका मॅटर | नगरसेवक सुनील कामाठीला न्यायालयीन कोठडी ; पत्नीस अंतरिम जामीन

सोलापूर,दि.26 : सोलापूर, राजभुलक्ष्मी इमारत कोंचिकोरवे गल्ली सोलापूर या ठिकाणी पोलिसांनी दि 24 ऑगस्ट रोजी मटका बुकी वर छापा टाकला होता. अवैध व्यवसाय प्रकरणी पोलिसांनी नगरसेवक सुनील कामाठीसह सुमारे 288 जणांविरुध्द गुन्हे दाखल केले.
या प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक सुनील कामाठी व त्यांची पत्नी सुनिता कामाठी, इस्माईल मुच्छाले आणि रफिक तोनशाळ यांना आज प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी जे.एम. मिस्त्री यांच्या समोर उभे केले असता नगरसेवक सुनील कामाठी व इस्माईल मुच्छाले यांची वाढीव 3 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती.

त्यावर आरोपींचे वकिलांनी यापूर्वी दिलेली पोलीस कोठडी ही पुरेशी होती व आरोपींकडून काही जप्त करण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे आरोपीस न्यायालयीन कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने पोलिसांनी पोलीस कोठडीची केलेली मागणी फेटाळली व चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी मध्ये ठेवण्याचे आदेश पारित केले.
तर सुनील कामाठी यांचे पत्नीस पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर अंतरीम जामीन मंजूर केला.

याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड.मिलिंद थोबडे ॲड.विनोद सूर्यवंशी ॲड. श्रीकांत पवार यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडवोकेट देवमाणे यांनी काम पाहिले.