‘या’ समाजकारी महिलांमुळे आजी-आजोबांना मिळते सुखाचे चार घास

सोलापूर : शहरात असे अनेक गरीब लोक राहतात, ज्यांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत असते. अनेकदा त्यांना उपाशीपोटी झोपावे लागते. तर काही जण पाणी पिऊन दिवस काढताहेत. महागाईचा मार आणि गरिबीचा भार सोसत ते दिवस पुढे ढकलत आहेत. अशा वृद्ध  लोकांना पोटभर अन्न मिळावे यासाठी शहरातील उद्योगवर्धिनी संस्थेच्या वतीने  दोन वेळचे मोफत जेवण पुरवले जाते. मागील ५ वर्षांपासून या उपक्रमाचा लाभ गरीब घेत आहेत.

उद्योगवर्धिनी संस्थेच्या माध्यमातून शहरातील एका संस्थेला व्यावसायिक तत्त्वावर डबे देण्याचे काम सुरू केले. या कामांसोबतच संस्थेच्या माध्यमातून अगदी नफा ना तोटा या तत्त्वावर गरिबांना पाच रूपयात जेवणाचा डब्बे देण्यात येऊ लागला. वास्तविक पाहता काही वृद्ध लोकांची पाच रुपये देखील देण्याची ऐपत नव्हती. वृद्धांची बाजू लक्षात घेत पुढे  व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग राखून ठेवून तो एकाकी जीवन जगणार्‍या या लोकांवर खर्च करायचा असा विचार पुढे आला.

केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून उद्योगवर्धिनी संस्थेने मोफत जेवणाचे डबे पुरवण्याचे काम सुरु केले. कुणीच उपाशी राहू नये या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमात सुरुवातीला पाच लोकांपासून सुरू केलेले काम आज जवळपास ७० वृद्ध आजी आजोबांना दोन वेळचे जेवणाचे डबे पुरवले जातात. रोज सकाळी १० आणि
संध्याकाळी सात वाजता डब्बे दिले जातात. सणासुदीच्या दिवशी त्यांना गोड पदार्थ देखील दिले जातात. जेवणाच्या डब्यात भाजी पोळी भाजी आमटी असे पौष्टिक अन्न दिले जाते. स्वच्छतेच्या बाबतीत येथे कटाक्षाने पाळला जातो.

उद्योगवर्धिनी संस्थेच्या प्रमुख चंद्रिका चव्हाण सांगतात की, “महिलांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवण्यासाठी २००४ ही संस्था स्थापन झाली. सुरुवातीला शिवणकाम सुरू झाले. पुढे बचतगटाच्या माध्यमातून दिवाळी फराळ तयार करण्याचे काम सुरू केले. त्यानंतर जेवणाचे डबे पुरवण्याचे काम हाती घेतले.
विशेष म्हणजे यासाठी लागणारा संपूर्ण खर्च याच संस्थेच्या महिला करतात. उद्योगवर्धिनी संस्थेत एकूण २२ महिला काम करतात. आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा ते समाजकार्यांसाठी देतात. या महिलांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम गेल्या दशकभरापासून अखंडपणे सुरू आहे.”

लॉकडाऊन मध्ये भागवली गरीबांची भूक 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर झाला. यामध्ये अनेक बेघर-निराधार लोकांचे हाल होऊ लागले. अशा कठीण प्रसंगी उद्योगवर्धिनी संस्थेने इतर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मंदिर परिसरात बसणाऱ्या लोकांना जेवण पुरविण्याचे काम केले. सलग तीन महिने ते या या लोकांना जेवणाचे डबे पूरवत त्यांची भूक भागवली.